‘दाना’दाण… महाराष्ट्राला अतिवृष्टीचा धोका! 24 ते 26 ऑक्टोबर तीन दिवस धोक्याचे

परतीच्या मान्सूनने राज्यासह देशाच्या विविध भागांना झोडपून काढले असताना बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘दाना’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्राला अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात पुढील काही दिवसांत सोसाटय़ाच्या वाऱयासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामुळे हवामान खात्याने राज्याला सावधगिरीचा अलर्ट जारी केला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला हवामान खात्याकडून ‘दाना’ असे नाव देण्यात आले आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव सध्या बंगालच्या उपसागरात प्रचंड वाढत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या दक्षिण भागापासून ते दक्षिण हिंदुस्थानात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हे चक्रीवादळ 24 ते 26 ऑक्टोबरदरम्यान पूर्वेकडील समुद्रकिनाऱयावर आदळण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम हिंदुस्थानसह बांगलादेश आणि म्यानमारवरही होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

या भागांमध्ये कोसळधार
– ‘दाना’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

– तर या वादळामुळे पुढील दोन दिवस तामीळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा धोका आहे.

– दक्षिण हिंदुस्थानात सतत पडणाऱया पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे असून हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

शेतीला फटका
राज्याच्या अनेक भागांत परतीच्या पावसामुळे तयार झालेले पीक अक्षरशः मातीत गेले आहे. उभे पीक आडवे झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यातच हवामान खात्याने पुन्हा एकदा खबरदारीचा अलर्ट जारी केला आहे.