बेळगाव केंद्रशासित झालाच पाहिजे – आदित्य ठाकरे

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील बेळगावात मराठी माणसावर अन्याय, अत्याचार होतोय. तेथील वातावरण चिघळले आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटका होत आहेत. हे आम्ही उघडय़ा डोळ्यांनी पाहू शकत नाही. सीमा भागातील मराठी माणूस महाराष्ट्रातील ईव्हीएम सरकारला लाडका आहे की नाही, असा संताप शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

आदित्य ठाकरे यांनी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात नव्या विधानसभा अध्यक्षांचा कौतुक सोहळा सुरू असताना दुसरीकडे बेळगावातील मराठी माणसावर अन्याय सुरू आहे. तो रोखण्यासाठी काही करणार का याचे उत्तर ईव्हीएम सरकारने द्यावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडीमध्ये असलेल्या काँग्रेसचेच सरकार कर्नाटकात आहे असे प्रसारमाध्यमांनी या वेळी निदर्शनास आणून देताच आदित्य ठाकरे म्हणाले की, काँग्रेसचे सरकार असो वा भारतीय जनता पक्षाचे सरकार असो, शिवसेनेने नेहमीच सीमा भागातील मराठी माणसासाठी आवाज उठवला आहे. मागच्या वर्षी आम्ही सीमाबांधवांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तेव्हा तत्कालीन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी बेळगावला अधिकचा निधी देऊन तेथील मराठी माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते. अजून ते न्याय देऊ शकले आहेत का? मराठी माणसावरचा अन्याय रोखू शकतात का? केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील नरेंद्र मोदी सरकार बेळगावला केंद्रशासित करणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणणारे आता गेले कुठे

‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप नेत्यांनी दिली होती. त्या घोषणेची आठवण करून देत आदित्य ठाकरे यांनी, ‘बटेंगे तो कटेंगे’ असं सांगणारे आता गेले कुठे? महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील जनताही हिंदू आहे. मग त्यांच्यावरील अत्याचार आपण कसा सहन करतोय? असा सवाल उपस्थित केला.