मल्लखांबपटू हिमानी परबला मिळाला न्याय, आमदार सुनील शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

अखेर ‘अर्जुन’ पुरस्कारप्राप्त मल्लखांबपटू हिमानी परबला न्याय मिळाला. आमदार सुनील शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे तिला शासकीय सेवेत थेट नियुक्ती मिळणार आहे. त्यामुळे ती लवकरच क्रीडा अधिकारी या पदावर रुजू होईल.

मल्लखांब खेळात महाराष्ट्रासह देशाचे नाव उज्ज्वल करणारी व मल्लखांबातील एकमेव ‘अर्जुन’ पुरस्कारप्राप्त हिमानी परबला शासकीय क्रीडा धोरणातील त्रुटींमुळे अतिउच्च गुणवत्तादार खेळाडू असूनही शासकीय सेवेत थेट नियुक्तीसाठी अडचण निर्माण होत होती. यासंदर्भात 2023 च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात विशेष उल्लेख सूचनेद्वारे शासकीय सेवेत थेट नियुक्तीसाठी ग्राह्य धरण्यात आलेल्या खेळांच्या यादीमध्ये ‘मल्लखांब’ या खेळाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी केली होती व यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता.

आमदार शिंदे यांच्या या प्रयत्नांमुळे हिमानीची आता राज्यशासनाच्या सेवेत ‘ब’ गट ‘क्रीडा अधिकारी’ म्हणून नियुक्ती झाली असून लवकरच ती या पदावर रुजू होणार आहे. या आनंदाच्या क्षणी हिमानीने वडील उत्तम परब यांच्यासह आमदार सुनील शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन केलेल्या सहकार्यासाठी आभार व्यक्त केले. यावेळी शिंदे यांनी तिचे अभिनंदन करीत भावी कारकीर्दीसाठी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या.