रोहित टी-20 वर्ल्ड कप जिंकणार

मायदेशात झालेल्या वन डे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग दहा सामने जिंकून फायनलमध्ये गेलेल्या यजमान ‘टीम इंडिया’ला अखेर उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. त्या पार्श्वभूमीवर रोहित शर्माचे कर्णधारपद जाणार अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू होती. मात्र आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी रोहितच हिंदुस्थानी संघाचा कर्णधार असेल, असे संकेत आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिले आहेत. ते म्हणाले, ‘गतवर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये सलग दहा विजयांनंतरही आपला संघ अहमदाबादमध्ये झालेल्या फायनलमध्ये पराभूत झाला. त्यामुळे आपण जगज्जेतेपद पटकावू शकलो नाही. पराभव झाला असला तरी आपण सर्वांचीच मनं जिंकली. मी तुम्हाला आश्वासन देतो की, या वर्षी होणाऱया टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बार्बाडोस येते आपण हिंदुस्थानचा तिरंगा झेंडा नक्की फडकवू,’ असे जय शहा म्हणाले. त्यामुळे रोहित शर्माची कर्णधारपदावरून उचलबांगडी होणार या चर्चेला जय शहा यांनी पूर्णविराम दिला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.