पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात सापडलं तळघर; तज्ञांच्या उपस्थितीत होणार पाहणी

श्री विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. हे काम सुरु असताना मंदिराच्या हनुमान गेट जवळ फरशीचे काम करीत असताना जमिनीखाली पोकळी असल्याचे आढळून आले आहे. या तळघरात अंधार असल्याने स्पष्ट असे काही दिसत नाही, मात्र खोली पाच ते सहा फूट खोल आहे या खोलीत मूर्ती सदृश्य वस्तू दिसते. या तळघरात नेमकं काय आहे हे तळघर केव्हाच आहे याविषयी तज्ञाकडून माहिती घेतली जात आहे.

मंदिराचे पूर्वापार पूजा अर्चा करणारे बडवे आणि उत्पात, पुजारी मंडळी यांचे कडून माहिती घेतली जात आहे. मुस्लिम आक्रमणा पासून बचाव करण्यासाठी श्री विठ्ठल रखुमाईची मूर्ती सुरक्षित स्थळी हलविली जात होती. त्यासाठीचे हे तळघर आहे का अशी शंका व्यक्त केली जात आहे.

दरम्यान या तळघराविषयी उलट सुलट चर्चा पंढरपूर पंचक्रोशीत सुरू आहे. सदरची माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.