‘ही’ घ्या बारसू विकणाऱ्या दलालांची यादी, जमीन व्यवहारात बडे अधिकारी आणि उद्योगपती

बारसू रिफायनरी प्रकल्पविरोधक गेले दीड वर्ष मुख्यमंत्र्यांच्या भेटीची प्रतीक्षा करत होते. वारंवार मागणी करुनही मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नव्हती. मुख्यमंत्री रत्नागिरी दौऱयावर असताना त्यांच्या भेटीसाठी निघालेल्या प्रकल्पविरोधकांना पोलिसांनी दोन वेळा रस्त्यावरच अडवले होते. आज मुख्यमंत्री राजापुरात आहेत अशी बातमी मिळताच प्रकल्पविरोधकांनी धडक मारून मुख्यमंत्र्यांना गाठलेच आणि मुख्यमंत्र्यांकडे प्रकल्पाच्या नियोजित जागेतील खरेदीविक्री व्यवहाराची चौकशी करा, अशी मागणी करताना जमीन व्यवहारातील दलालांची यादीच दिली.

मेळाव्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजापुरात आले असताना रिफायनरी प्रकल्पविरोधकांनी त्यांची भेट घेऊन निवेदनही सादर केले. त्यामध्ये रिफायनरीसाठी प्रस्तावित जागेतील जमीन व्यवहारात प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, उद्योगपती गुंतलेले असल्याची तक्रार करताना, जमीन व्यवहारातील दलालांची यादी दिली.

खोटे गुन्हे मागे घ्या!

प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करत असताना ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी रिफायनरी प्रकल्पविरोधी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

जागतिक वारसास्थळ घोषित करा

धोपेश्वर, बारसू, सोलगाव, देवाचे गोठणे, गोवळ, नाटे, राजवडी, आंबोळगड या सडय़ावर कातळशिल्पांचा सांस्कृतिक ठेवा आहे. बारसूलगतच्या सडय़ावर दोनशेहून अधिक कातळशिल्पे आढळल्याने संपूर्ण सडा जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

शिवडी-न्हावा शेवा पुलाला वाजपेयींचे नाव

मुंबईहून अवघ्या 15 मिनिटांत नवी मुंबईत पोहोचवणाऱया शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. अटल सेतू नावाची पाटी झळकली आहे. या सागरी सेतूचे उद्घाटन शुक्रावार, 12 जानेवारीला करण्यात येणार आहे. हा सागरी सेतू मुंबईच्या नागरी सुविधा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मैलाचा दगड ठरणार आहे.