जालना जिल्ह्यात बार अॅण्ड रेस्टॉरंटसह घरफोडी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले असून, आरोपींच्या ताब्यातून 13 लाख 6 हजार 920 रुपये किमंतीचे वेगवेगळ्या कंपनीची विदेशी दारू व बिअरचे बॉक्स जप्त करून जिल्ह्यातील 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई आज 11 डिसेंबर रोजी जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे.
जालना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे येथे बार अॅण्ड रेस्टॉरंट फोडून घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जालना येथील पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना दिल्या, पोलीस निरीक्षक पंकज जाधव, स्थागुशा जालना यांनी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष तपास पथक तयार करून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना देऊन मार्गदर्शन केले. पथकातील अधिकारी व अमंलदार हे गुन्हेगाराची माहिती घेत असतांना घनसावंगी येथील चैतन्य बार अॅण्ड रेस्टॉरंट येथील विदेशी दारूचे बॉक्स व बिअर बॉक्सची चोरी महेश राजेंद्र तवले (रा. मादळमोही, ता. गेवराई, जि. बीड. ह.मु. घनसावंगी) याने त्याच्या साथीदारांसह केल्याची माहिती मिळाली.
आरोपींचा शोध घेतला असता त्यास ताब्यात घेऊन गुन्हे संबंधाने चौकशी केली असता दारूच्या बॉक्सची चोरी केल्याचे कबूल केले. आरोपी व त्याचा साथीदार नामे प्रेमराज ऊर्फ किशोर दशरथ देवकर (रा. मादळमोही, ता. गेवराई) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेले वेगवेगळया कंपनीचे विदेशी दारूचे बॉक्स व चोरी करण्यासाठी वापरलेले वाहन असा 10 लाख 47 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीची चौकशी केली तपास केला असता महेश राजेंद्र तवले याने काही माल हा शेख इरफान ऊर्फ बबलू शेख उस्मान (रा. घनसावंगी) यास दिल्याचे निष्पन्न झाल्याने शेख इरफान शेख उस्मान यास ताब्यात घेऊन चौकशी केली. आकाशसिंग नरसिंग बाबरी व तकदिरसिंग टिटुसिंग टाक (दोन्ही रा. मंगळबाजार, जालना) यांनी दोन ते तीन वेळा वेगवेगळ्या कंपनीचे विदेशी दारूचे बॉक्स व बिअरचे बॉक्स विक्रीसाठी आणून दिल्याचे सांगितले. आकाशसिंग नरसिंग बाबरी व तकदिरसिंग टिटुसिंग टाक (दोन्ही रा. मंगळ बाजार, जालना) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी पोलीस ठाणे घनसावंगी हद्धीत तीन ठिकाणी, पोलीस ठाणे बदनापूर हद्दीत दोन ठिकाणी व पोलीस ठाणे परतूर हद्दीत एका ठिकाणी अशा सहा ठिकाणी असलेल्या बार ॲण्ड रेस्टॉरंटमध्ये चोरी केल्याचे कबूल केले. आरोपींकडून गुन्ह्यातील चोरी गेलेला दारूचे बॉक्स व बिअरचे बॉक्स असा एकूण 13 लाख 6 हजार 920 रुपयाचा मुद्देमाल जप्त केरण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पव्हरे, लक्ष्मीकांत आडेप, सुधीर वाघमारे, प्रशांत लोखंडे, फुलचंद गव्हाणे, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, आक्क्रुर धांडगे, कैलास चेके, धीरज भोसले, योगेश सहाने, सोपान क्षीरसागर, भागवत खरात, सौरभ मुळे यांनी केली.