ठाण्यात पुढच्या वर्षी शाडूच्या मातीचे बाप्पा, पालिकेने केली सहा महिने आधीच तयारी

गणेशोत्सवाला अजून बराच अवधी असला तरी गणपतीच्या मूर्ती शाडू मातीच्या बनविण्यासाठी ठाणे महापालिकेने आतापासूनच पुढाकार घेतला आहे. या मूर्ती भाविकांना किफायतशीर दरात मिळाव्यात तसेच मूर्तिकारांनी रस्ते न अडवता मोकळ्या मैदानातील जागेत कार्यशाळा उभारावी. यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागाने सहा महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला असून पुढच्या वर्षी शाडू मूर्तीचेच बाप्पा विराजमान करण्याचा संकल्प पालिकेने केला आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवाव्यात. यासाठी दरवर्षी जनजागृती करूनही मूर्तिकार याकडे दुर्लक्ष करतात. उच्च न्यायालयाने याबाबत महापालिकेचे कान टोचले होते. तरी ठाणे महापालिका क्षेत्रात 2024 च्या गणेशोत्सवात सुमारे 30 टक्के मूर्ती या शाडूच्या होत्या. हे प्रमाण पुढील वर्षी 2025 मध्ये वाढवण्यासाठी पर्यावरण विभागाने सहा महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. 2025 च्या गणेशोत्सवात ठाणेकरांचा शाडूच्या मूर्तीकडे कल वाढावा यासाठी त्या मूर्ती किफायतशीर कशा होतील यासाठी प्रयत्न करावेत. तसेच रस्तोरस्ती लागणाऱ्या मूर्ती विक्री केंद्राऐवजी केंद्रीत पद्धतीने ठिकठिकाणच्या मोकळ्या जागांमध्ये, मैदानात स्टॉलची व्यवस्था करावी, म्हणजे रस्ते वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा येणार नाही याची दक्षता सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभागात घ्यावी, असे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

मूर्तिकारांशी संवाद साधावा 

मूर्तिकार, गणेश मंडळे, पर्यावरण विषयातील संस्था यांच्या मदतीने याबाबत जनजागृती करण्यात यावी. मूर्तिकारांशी संवाद साधून त्यांना शाडूची माती आणि कार्यशाळेसाठी जागा आगाऊ उपलब्ध करून द्यावी, असेही आयुक्तांनी सांगितले.