थांबा, संघर्ष सुरू आहे! रोहित, विराट आणि सरफराजच्या अर्धशतकामुळे हिंदुस्थान 3 बाद 231

पहिल्या डावात 46 धावांतच दिग्गज फलंदाजीची कत्तल झाल्यामुळे अव्वल हिंदुस्थान बॅकफूटवर पडला. त्यातच न्यूझीलंडने खणखणीत 402 धावा करत 356 धावांची महाआघाडी घेत कसोटीवर आपली पकड मजबूत केली. तेव्हा  बलाढय़ फलंदाजीने आपल्या लौकिकास साजेसा संघर्ष करत हिंदुस्थानला तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 231 अशी चोख सुरुवात करून दिली. पहिल्या डावातील पिछाडी भरून काढण्यासाठी अद्याप 125 धावांची गरज असून हिंदुस्थानी फलंदाजीला कसोटीत कमबॅक करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे. दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर विराट कोहलीची संयमी खेळी 70 धावांवर संपताच हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींच्या काळजाचा ठोका चुकला. तिसऱ्या दिवसअखेर खेळ थांबला तेव्हा सरफराज खान 70 धावांवर खेळत होता.

रचिन रवींद्रची सुसाट फलंदाजी

काल 3 बाद 180 धावांवर असलेल्या पाहुण्या न्यूझीलंड रोखणे, हिंदुस्थानी गोलंदाजीचे प्रथम कर्तव्य होते. हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी तशी कामगिरीही केली, पण रचिन रवींद्र हिंदुस्थानी गोलंदाजांच्या हाताला लागलाच नाही. 7 बाद 233 अशी अवस्था करत हिंदुस्थानने कसोटीत पुनरागमन करण्याची धडपड केली होती. पण त्यानंतर रवींद्रने टीम साऊदीच्या साथीने 137 धावांची झंझावाती आणि अफलातून भागी रचत त्यांनी संघाची आघाडी चक्क 324 इतकी ताणली. 88 चेंडूंत आपले अर्धशतक साजरे करणाऱ्या रवींद्रने आपले कारकीर्दीत दुसरे शतक 124 व्या चेंडूंवर पूर्ण केले. यात 11 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. साऊदीने आपल्या खेळीत 4 षटकार आणि 5 चौकार खेचत 65 धावांवर पोहोचला. तो बाद झाल्यावर रवींद्रही 134 धावांवर बाद झाला आणि न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांच्या विक्रमी आघाडीसह 402 धावांवर संपला.

कोहलीसरफराजची फटकेबाजी

सलामीची जोडी बाद झाल्यानंतर हिंदुस्थानी संघाची सारी मदार विराट कोहलीच्या खांद्यावर आली आणि धावांसाठी चाचपडत असलेल्या या धावांच्या भुकेल्या फलंदाजाला सूर सापडला. विराटने आपले पाय रोवत धावा काढल्या, पण खरी मजा सरफराज खानच्या फटक्यांनी आणली. गेले काही संघाबाहेर असलेल्या सरफराजने संघात पुनरागमन करताना केलेली फटकेबाजी टाळय़ा मिळवून गेली. दोघांनी वेगात शतकी भागीसुद्धा रचली. विशेष म्हणजे, सरफराजने 42 चेंडूंत पन्नाशी साजरी केली. यात 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर तो काहीसा शांत झाला, तर विराट पेटून उठला. दोघांचा खेळ हिंदुस्थानच्या डावाला मजबुती देणारा ठरत होता. 136 धावांची भागी उद्या हिंदुस्थानला आणखी बळकटी देईल असे वाटत असताना दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर विराटला बाद होण्याचे दुर्दैव पचवावे लागले. ग्लेन फिलीप्सच्या फिरकीने विराटची विकेट काढत स्टेडियममध्ये स्मशानशांतता पसरवली. पाय रोवून उभा असलेल्या विराटची विकेट कुणाच्या पचनीच पडली नाही. हा हिंदुस्थानी डावाला खूप मोठा धक्का होता. विराटची खेळी 70 धावांवर थांबली, तर दुसरीकडे सरफराज 70 धावांवर खेळत होता. सरफराजने गेल्याच सामन्यात द्विशतकी खेळी केली होती आणि त्याला संघातील आपले स्थान पक्के करण्यासाठी या खेळीलाही मोठे करावे लागणार आहे.

अखेर विराटच्या 9 हजार धावा

आपल्या 100व्या कसोटीत 8 हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्या विराट कोहलीला 9 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी तब्बल 16 कसोटी सामने आणि 29 डाव खेळावे लागले. गेली काही वर्षे फलंदाजीत अपयशी ठरत असलेल्या कोहलीने या टप्प्यात दोन शतके आणि 4 अर्धशतके झळकवली आहेत. आज त्याने 53वी धाव काढत हा टप्पा पूर्ण केला आणि तो कसोटी इतिहासातील हिंदुस्थानचा चौथा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकर (15921), राहुल द्रविड (13288) आणि सुनील गावसकर (10122) हेच तिघे विराटच्या पुढे आहेत. जागतिक पातळीवर तो हा टप्पा गाठणारा 18वा फलंदाज ठरला आहे. विराटने आतापर्यंत 116 कसोटींत 48.74 धावांच्या सरासरीने 9017 धावा केल्या आहेत. यात 29 शतके आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे.

रोहितयशस्वीची आश्वासक सुरुवात

356 धावांची पिछाडी असल्यामुळे कर्णधार रोहित शर्मावर आश्वासक सलामी देण्याचा दबाव होता. या दबावाखाली शर्माने यशस्वी जैसवालच्या साथीने 72 धावांची सलामी दिली. या दोघांचा खेळ पाहून हिंदुस्थान पहिल्या डावातील अपयश धुऊन काढण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार याचे संकेत मिळाले. दोघेही सावध खेळत होते, पण मोठा फटका मारण्याच्या नादात जैसवाल (35) बाद झाला. पुढे रोहित शर्माने आपले अर्धशतक साजरे केले खरे, पण तो आपल्या खेळीला मोठी करू शकला नाही. संघाचे शतकही फलकावर लागले नव्हते आणि हिंदुस्थानने आपली सलामीची जोडी गमावल्यामुळे न्यूझीलंडने पुन्हा डोके वर काढले होते.

150-200 धावांची आघाडीही आव्हानात्मक

2 बाद 231 असलेला हिंदुस्थान 3 बाद 231 झाल्यामुळे साऱयांनाच धक्का बसला आहे. तरीही हिंदुस्थानी संघ मजबूत स्थितीत आहे. कसोटीच्या चौथ्या दिवशी हिंदुस्थानी फलंदाजांनी संघाला 500-550 धावांचा टप्पा गाठून देत 150-200 धावांची आघाडीही न्यूझीलंडसाठी आव्हानात्मक ठरू शकतो. त्यामुळे हिंदुस्थानसाठी पहिले सत्र अत्यंत महत्त्वाचे असून हे यशस्वीपणे खेळून काढण्यावर फलंदाजांना भर द्यावा लागणार आहे.

गोलंदाजांचा संघर्ष अपयशी ठरला

कालच्या 3 बाद 180 धावांवरून न्यूझीलंडने डाव सुरू केला आणि सिराजने दिवसाच्या पाचव्याच षटकात डॅरिल मिचेलची विकेट काढत हिंदुस्थानच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटवली. मग जसप्रीत बुमरानेही टॉम ब्लंडलचा यष्टीमागे झेल देण्यास भाग पाडले. पुढे रवींद्र जाडेजाने ग्लेन फिलीप्स आणि मॅट हेन्रीची विकेट उडवत संघात नवचैतन्य फुलवले. तासभरातच न्यूझीलंडची 7 बाद 233 अशी अवस्था झाल्यामुळे हिंदुस्थानी गोलंदाजांकडून लवकर डाव संपवण्याची आशा होती. पण रचिन रवींद्र आणि टीम साऊदीने हिंदुस्थानी गोलंदाजांचा हा संघर्ष मोडीत काढला. या धावसंख्येत 26 षटकांत चक्क 169 धावांची तुफानी भर टाकण्याची कमाल रवींद्र आणि साऊदीने केली. कुलदीप आणि जाडेजाने प्रत्येकी 3-3 विकेट टिपले.

पंत आला रे

ऋषभ पंतच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने संघाचा पाय आणखी खोलात गेला होता. काल दिवसभर तो मैदानातही दिसला नव्हता आणि आजही त्याला विश्रांती देण्यात आली. मात्र उद्या हिंदुस्थानी डावाला त्याची अत्यंत गरज असल्यामुळे तो फलंदाजीला उतरणार हे निश्चित आहे. आज चहापानाच्या विश्रांतीदरम्यान तो मैदानावर झेल टिपण्याचा सराव करताना दिसला.फलंदाजी करताना दिसला. पंत मैदानावर दिसताच क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला. पहिल्या डावात त्यानेच सर्वाधिक 20 धावा केल्या होत्या. त्यात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागी ध्रुव जुरेलला यष्टिरक्षणाची जबाबदारी दिली. पंत दुखापतीतून बाहेर आला असून तो उद्या मैदानात आपल्या फटक्यांचा नजराणा पेश करत हिंदुस्थानी डावाला सुस्थितीत आणेल अशी साऱयांचीच अपेक्षा आहे.