हवामान खात्याची पाऊसवाणी तंतोतंत खरी ठरली. त्यामुळे चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजांऐवजी पावसानेच संततधार बॅटिंग केल्यामुळे ओल्या झालेल्या पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. कसोटीच्या दुसऱया दिवशीही पावसाचीच शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे खेळाडूंऐवजी ग्राऊंड स्टाफच मैदानात पाणी काढताना दिसतील असेच चित्र आहे.
त्यांचा बॅझबॉल…आपला हिटबॉल
कानपूर कसोटीत तब्बल अडीच दिवसांचा खेळ वाया गेला होता. सामना अनिर्णितावस्थेकडे झुकला होता. तेव्हा हिंदुस्थानने कसोटीला टी-20 स्टाइलने खेळत अनोखे रंग भरले. काहींनी रोहितच्या धडाकेबाज फलंदाजीच्या निर्णयाला बॅझबॉलचा टिळा लावला; पण तो बॅझबॉल नव्हे, तर आपला अस्सल देशी हिटबॉल खेळ होता. कानपूर कसोटीत रोहितच्या हीट डोक्यातून निघालेली धुवांधार फलंदाजी हिट ठरली आणि या फटकेबाज खेळाला हिटबॉल असे नामकरण करण्यात आले. हिंदुस्थानच्या साऱयाच फलंदाजांनी सुपरहिट फटकेबाजी करत वेगवान धावांचे अनेक नियम आपल्या नावावर नोंदवले होते. आता या हिटबॉलचा खेळ पावसाने भिजलेल्या चिन्नास्वामी स्टेडियमवरही पाहायला मिळणार, इतके निश्चित आहे. पण पाऊस किती विश्रांती घेतोय यावर सारे अवलंबून आहे.
कानपूर कसोटीचीच पुनरावृत्ती?
बंगळुरू कसोटीतही कानपूर कसोटीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्याच महिन्यात कानपूर येथे झालेल्या कसोटीतही पावसाने जबरदस्त बॅटिंग करत अडीच दिवसांचा खेळ वाया घालवला होता. आता बंगळुरूतही पुढील दोन दिवस पाऊस अडथळा निर्माण करणार असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे. पहिल्या दिवशी पावसाने कोणालाच खेळू दिले नाही. ढगाळ वातावरणामुळे ग्राऊंड स्टाफ मैदानातील पाणी काढण्यासाठी झटत होता, तर दुसरीकडे पंचमंडळी केवळ पावसाच्या विश्रांतीची वाट पाहत होते. पण पावसाने काही विश्रांती घेतली नाही. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा दिवस विश्रांतीचा ठरला. वारंवार पाहणी केल्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास पंचांनी आजचा खेळ रद्द केल्याचे जाहीर केले. पुढील चारही दिवस पावसाची शक्यता असल्यामुळे या कसोटीतही कानपूर कसोटीप्रमाणे टी-20सारखी फटकेबाजी पाहायली मिळण्याची दाट शक्यता आहे.
सरफराज पुन्हा संघाबाहेरच?
नुकत्याच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत बाकावर बसलेल्या सरफराज खानला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही बाहेर बसूनच कसोटी पाहण्याचे काम करावे लागणार असल्याचे अंदाज आहे. बांगलादेशविरुद्ध एकाही कसोटीत संधी न मिळाल्यामुळे निराश झालेल्या सरफराजने आपल्या फलंदाजीचा राग इराणी करंडकात शेष हिंदुस्थानी संघाच्या गोलंदाजांवर काढला आणि खणखणीत द्विशतक झळकवले. एवढेच नव्हे तर, तब्बल अडीच दशकांनंतर मुंबईला इराणी करंडकही जिंकून दिला. आता बंगळुरू कसोटीत तो संघात बसण्याची शक्यता कमीच आहे. हवामानानुसार संघात तीन वेगवान गोलंदाज खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला तर कसोटी खेळण्याची आतुरतेने वाट पाहत असलेल्या कुलदीप यादवलाही बाहेर बसावे लागू शकते.
ना टॉस उडवला, ना संघ जाहीर केला…
आता थांबेल, आता टॉस उडवला जाईल… अशी साऱयांनाच प्रतीक्षा होती, पण पाऊस काही थांबलाच नाही. दिवसभर चिन्नास्वामीवर ठाण मांडून बसलेल्या पावसाने कुणाला मैदानात उतरूच दिले नाही. त्यामुळे दोन्ही संघांचे कर्णधार ना टॉस उडवायला आले ना त्यांनी संघ जाहीर करण्याची घाई दाखवली. आता पावसामुळे वेगवान गोलंदाजांना लाभ मिळण्याची शक्यता असल्यामुळे उभय संघ बुधवारी सकाळी वातावरण पाहूनच आपला अंतिम अकरा खेळाडूंचा संघ जाहीर करतील.