कालीमातेचे मंदिर अन् मातृभूमीला सोडणार नाही… बांगलादेशातील हिंसाचारात पुजाऱ्यांनी दाखवली हिंमत

शेखर लाल गोस्वामी (73 वर्षे). बांगलादेशची राजधानी ढाका येथील 583 वर्षे पुरातन सिद्धेश्वरी काली मंदिराचे पुजारी आहेत. मंदिराचे पौरोहित्य करणारी गोस्वामी यांची ही 12 वी पिढी आहे. सध्या बांगलादेशातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत. अशा परिस्थितीत शेखर लाल गोस्वामी कालीमातेचे मंदिर आणि देश सोडून जायला तयार नाहीत. ‘यापेक्षा वाईट काळ मी बांगलादेशात बघितलाय. काही झाले तरी मंदिर सोडणार नाही,’ असा निर्धार त्यांनी केलाय.

शेखर लाल गोस्वामी आपले दोन चुलते, मुलगा आणि कुटुंबीयांसमवेत ढाका येथील मौचक बाजारातील सिद्धेश्वरी लेनमध्ये (मंदिराच्या थोडे पुढे) राहतात. वयोवृद्ध शेखर लाल गोस्वामी यांना जुन्या घटना आठवतात. 1971 साली पाकिस्तानच्या लष्कराने त्यांचे दोन वेळा अपहरण केले होते. त्यानंतर ते हिंदुस्थानी जवानांच्या मदतीने मुक्तिसंग्रामासाठी मुक्ती वाहिनी दलात सामील झाले.

मातृभूमीतच यावे मरण

बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग करून परदेशात विशेष करून पश्चिम आशियात काम केले. 1991 साली बांगलादेशात जातीय दंगली झाल्या तेव्हाही त्यांनी देश सोडला नाही. निवृत्तीनंतर वयाच्या 65 व्या वर्षांपासून ते कालीमातेच्या मंदिराचा पुजारी म्हणून काम करत आहेत. शेखर लाल गोस्वामी सांगतात, तेव्हापासून आजतागायत मी मंदिराचा पुजारी आहे. मी खूप काही पाहिले आहे. मी माझी मातृभूमी कधीच सोडणार नाही. मला माझ्या मातृभूमीतच मरण यावे.

मुक्तिसंग्रामात सहभाग

गोस्वामी बांगलादेश मुक्तिसंग्रामात सहभागी झाले होते. त्रिपुरा येथील आगरतळा येथे त्यांनी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतले होते. तिथे त्यांनी आपल्या मोठय़ा भावासोबत आणि मित्रांसोबत प्रशिक्षण घेतले.