राजकीयनंतर आता बांगलादेशमध्ये न्यायालयीन अस्थिरतेचे संकट; सरन्यायाधीश राजीनामा देणार

बांगलादेशमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शेख हसीन यांनी पंतप्रधानाचा राजीनामा देत देश सोडल्यानंतर बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाले. त्यानंतर देशातील वातावरण निवळेल अशी शक्यता होती. मात्र शनिवारी या शक्यतेवर पाणी सोडत आंदोलकांनी थेट सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला.

आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाला चौफेर घेराव घालत सरन्यायाधीशांसह इतर सर्व न्यायमूर्तींनी तासाभरात राजीनामा द्यावा अशी मागणी केली. सरन्यायाधीशांसह इतर न्यायमूर्तींनी राजीनामा दिला नाही तर आम्ही त्यांच्या घरात घुसू असा इशारा आंदोलकांनी दिला होता.

आंदोलक अनियंत्रित होत असल्याचे पाहून सरन्यायाधीश ओबैदुल हसन यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सायंकाळी राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर ते राजीनामा सोपवणार आहेत. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायमूर्तींची एक बैठक बोलावल्याची बातमी वाऱ्याच्या वेगासारखी पसरली आणि आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली. बहुतांश आंदोलक हे विद्यार्थी असून त्यांनी इतर वकिलांसह सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला. सरन्यायाधीश अंतरिम सरकारला बेकायदेशीर घोषित करणार असल्याचा वावड्या उठल्याने आंदोलक संतापले आणि त्यांनी सरन्यायाजधीशांच्या राजीनाम्याची मागणी रेटून धरली.