पहिल्याच दिवशी 16 फलंदाज गारद, बांगलादेश सर्व बाद 104 तर द. आफ्रिका 6 बाद 140

हिंदुस्थानविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारून विजयाची गाडी पुन्हा रुळावर आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या बांगलादेशच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला. कगिसो रबाडा, केशव महाराज आणि वियान मुल्डरच्या भेदकतेपुढे बांगलादेशच्या फलंदाजीचा कणा मोडला आणि बांगलादेश अवघ्या 104 धावांतच गारद झाला. मात्र, फलंदाजांकडून झालेल्या चुकांची कसर बांगलादेशच्या तैजुल इस्लामने गोलंदाजीत भरून काढली. तैजुलने पाच विकेट घेत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची नांगी ठेचली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेची 6 बाद 140 अशी अवस्था केली. त्यामुळे पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचे 244 धावांत 16 फलंदाज बाद झाले.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय बांगलादेशने घेतला खरा; मात्र हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला. वियान मुल्डरने दुसऱ्याच षटकात बांगलादेशला धक्का देताना शादमन इस्लामला शून्यावर बाद केले. त्यानंतर पुढील षटकांमध्ये मुल्डरने मोमिनूल हक (4) व कर्णधार नजमूल हुसैन शांतो (7) यांना बाद केल्याने बांगलादेशची अवस्था 3 बाद 21 धावा अशी झाली होती. महमुदुल्लाह आणि मुस्ताफिजूर रहिम यांनी बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, कगिसो रबाडाने भन्नाट चेंडूवर रहिमचा 11 धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर लिटन दासचाही (1) अडथळा दूर केला.

दरम्यान, न्यूझीलंडने पहिल्या डावात हिंदुस्थानचा डाव 46 धावांवर गुंडाळून धक्का दिला. त्यामुळे हिंदुस्थानच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला. याच विक्रमाची पुनरावृत्ती बांगलादेशकडून होते की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, सलामीवीर महमुदूल हसन जॉयने 30 धावांची खेळी करून तो नकोसा विक्रम बांगलादेशच्या नावावर होण्यापासून रोखले.