शहरात फ्लाईंग कंदीलच्या वापरावर बंदी

महिनाभर शहरात फ्लाईंग कंदिलाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. कोणीही फ्लाईंग कंदील उडवायचे नाही. इतकेच नाही तर या कंदीलची विक्री, साठवणूक व विक्रीवरदेखील बंधन राहणार आहे. असामाजिक घटकांच्या कारवाया रोखण्यासाठी महिनाभर ही बंदी राहणार असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. शिवाय सर्वत्र दिवाळीची तयारीदेखील सुरू आहे.

दिवाळीत आकाशकंदील उडविण्याचा आनंद लुटला जातो; परंतु असामाजिक घटकांकडून या फ्लाईंग कंदिलांचा दुरुपयोग होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. 23 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत शहरात फ्लाईंग कंदील उडविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय या कंदीलची साठवणूक, विक्री व वापर करण्यासदेखील मज्जाव करण्यात आला आहे. असे असतानाही कोणी हेतुपुरस्सर फ्लाईंग कंदीलचा वापर, विक्री व साठवणूक करणारा सापडेल अशांवर भारतीय न्याय संहिता 2023 घ्या कलम 223 अन्वये कारवाई करण्यात येणार येईल, असा इशारा मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे.