शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात नशा आणणाऱ्या अप्रमाणित एनर्जी ड्रिक्सवर बंदी

राज्यातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या, नशा आणणाऱ्या अप्रमाणित एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शाळा परिसरात पॅक आणि प्रमाणित एनर्जी ड्रिंक्स सोडून 500 मीटर अंतराच्या आत बर्फ, रंग आणि इतर घटक मिसळून तसेच त्यातील पॅफीनचे प्रमाण वाढवून तयार करण्यात येणाऱ्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनमंत्री धर्मारावबाबा आत्राम यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यातील पॅफेनचे अतिरिक्त प्रमाण असलेल्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी आणण्याबाबत विधान परिषदेत सत्यजीत तांबे यांनी प्रश्न विचारला होता. राज्यातील मुंबईसह नाशिक तसेच शहरी आणि ग्रामीण भागात एनर्जी पेयांच्या (ड्रिंक्सच्या) नावाखाली पॅफेनचे अतिरिक्त प्रमाण असलेली एनर्जी ड्रिंक्स बाजारात विक्रीला आहेत. खुल्या बाजारात विकल्या जाणाऱ्या या ड्रिंक्समध्ये 250 मिलीच्या बाटलीत 75 मिली ग्रॅमपेक्षा जास्त पॅफेन असल्यामुळे नशा येते. त्यामुळे मेंदू, किडनी, मज्जारज्जू यावर परिणाम होऊन अस्वस्थता, निद्रानाश, प्रजनन समस्या, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, चिडचिडेपणा अशा शारीरिक आजारही निर्माण होत आहे. शाळा आणि कॉलेजमधील मुलांना या तथाकथित एनर्जी ड्रिंक्सच्या पाठीमागे लागले आहेत. हा धोका लक्षात घेऊन शाळा आणि कॉलेज परिसरात या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालावी त्याचबरोबत त्यासंदर्भातील आक्षेपार्ह जाहिरातींवर कारवाई करण्याची मागणी सत्यजीत तांबे यांनी केली होती.

अतिशयोक्ती करणाऱ्या जाहिरातींवर बंदी घाला!

शाळकरी मुलांना आणि तरुणाईला भुरळ घालणाऱ्या जाहिराती या अतिरंजित असतात. पेप्सिको पंपनीच्या स्टिंग या एनर्जी ड्रिंक्सची जाहिरात अशीच आहे. स्टिंगच्या जाहिरातीत एनर्जी ड्रिंक्स पिऊन एक तरुण 15 मजले धावत चढतो असे दाखवले आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयातील मुलांवर याचा चुकीचा परिणाम होण्याची शक्यता असते. 50 रुपयांची गोळीही विद्यार्थ्यांना अनेक दिवस नशा देत असते. त्यामुळे अशा पदार्थ आणि जाहिरातींवर बंदी घालावी, अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली. त्यावर उत्तर आत्राम म्हणाले, विभागात अधिकारी कमी आहेत, लॅबही कमी आहेत. येत्या काही वर्षांत अन्न आणि औषध प्रशासन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देऊ, असे आश्वासन दिले.

भेसळीविरोधात कारवाई सुरू

राज्यात दूध भेसळीविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत एका वर्षात 44 हजार 161 लिटर दुधाची भेसळ पकडली. तसेच दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल 5 लाख 14 हजार 847 किलो म्हणजे 16 कोटींची भेसळ पकडली तर 30 कोटींचा गुटखा पकडला आहे.