अमेरिकेतील नॅशनल क्रिकेट लीगवर बंदी, नियमांचे उल्लंघन केल्याने ‘आयसीसी’ची कारवाई

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अमेरिकेतील नॅशनल क्रिकेट लीगला मंगळवारी मोठा धक्का दिलाय. वसीम अक्रम आणि सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांसारख्या दिग्गजांचाही या लीगशी थेट संबंध आहे. मात्र एका नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आयसीसीने अमेरिकेच्या या टी-10 क्रिकेट लीगवर तडकाफडकी बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

आयसीसीने पुढील हंगामाला मान्यता देण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. कारण यामध्ये नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले. एका चुकीमुळे या अमेरिकन क्रिकेट लीगचे मोठे नुकसान झाले आहे. क्रिकेटची लोकप्रियता वाढविण्यासाठी आणि प्रसारासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) अनेक देशांमध्ये वेगवेगळय़ा क्रिकेट लीगचे आयोजन करते. वर्षभरापूर्वी आयसीसीने नॅशनल क्रिकेट लीग ऑफ यूएसएला मान्यता दिली होती; मात्र अवघ्या वर्षभरातच आयसीसीने या क्रिकेट लीगवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या लीगमध्ये सुरेश रैना व दिनेश कार्तिक या हिंदुस्थानींसह पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीनेही सहभाग घेतला होता. वेस्ट इंडीजचे माजी दिग्गज खेळाडू व्हिव्हियन रिचर्ड्स आणि पाकिस्तानचे माजी दिग्गज वसीम अक्रम यांना यूएसए नॅशनल क्रिकेट लीगचे ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ बनवण्यात आले होते.

लीगवर बंदी घालण्याचे कारण

नियमांनुसार, या लीगमधील प्रत्येक संघासाठी सात अमेरिकन खेळाडू आणि चार परदेशी खेळाडू असणे अनिवार्य आहे, मात्र संघांनी या नियमांचे उल्लंघन केले. हा नियम मोडल्याची माहिती आयसीसीला आधीच मिळाली होती. याशिवाय व्हिसाच्या नियमांचेही उल्लंघन करण्यात आले. आयसीसीनेही उशीर न करता लीगवर बंदी घातली. आयसीसीने पत्र लिहून अमेरिकेच्या क्रिकेट लीगवर बंदी घालण्याची माहिती दिली. अशा स्थितीत नॅशनल क्रिकेट लीगच्या पुढील हंगामाचे आयोजन केले जाणार नाही. गतवर्षीच्या रॉबिन उथप्पाच्या नेतृत्वाखालील शिकागो सीसी संघाने अटलांटा किंग संघाला 43 धावांनी धूळ चारून पहिल्या हंगामात विजेतेपद पटकाविले होते.