दहशतीचे राजकारण जनता सहन करणार नाही; बाळासाहेब थोरात यांचा नाव न घेता विखेंवर निशाणा

आपण कधीही चुकीचे राजकारण केले नाही. सर्वांना बरोबर घेऊन प्रेमाने आणि विकासाचे राजकारण केले म्हणून जनता सातत्याने आपल्या सोबत आहे. त्यांचे सुरू असलेले दहशतीचे आणि जिरवाजिरवीचे राजकारण फार काळ चालणार नसून दहशतीचे राजकारण आता जनता सहन करणार नाही, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

आश्वी बुद्रुक येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या नूतन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दहशत व दडपशाही असतानाही आश्वी व परिसराने 25 वर्ष सातत्याने मोठे मताधिक्य दिले. आपण विकास कामांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. विरोधकांची ही कामे केली. मागील अडीच वर्षाच्या काळात या परिसरातील अनेक पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या. यासाठी पाठपुरावा केला. सर्वांना बरोबर घेऊन प्रेमाचे व विकासाचे राजकारण केले ही आपली परंपरा आहे. मात्र या उलट या परिसरामध्ये मोठी दहशत आहे. विरोधी गावचा सरपंच असेल तर अगदी पिण्याच्या पाण्यापर्यंत राजकारणाचे विष या लोकांनी नेऊन ठेवले आहे. जिरवा जिरवीचे आणि दमदाट्याचे राजकारण फार काळ चालत नाही. दहा वर्ष गणेश तुमच्या ताब्यात असताना चांगला चालवता आला नाही. आमची भावना आणि उद्देश चांगला म्हणून गणेश कारखाना अत्यंत चांगला चालला मात्र. त्यामध्येही अनेक अडचणी निर्माण करण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. गोरगरिबांच्या प्रपंचाशी खेळू नका सत्तेचा गर्व जनतेने उतरवला आहे. संगमनेर प्रमाणे राहता आणि शिर्डीमध्येही चांगले वातावरण निर्माण करू, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

‘तुमची लोकसभेत जनतेने दमछाक केली, आता तुम्ही कुटुंबाला वेळ द्या’

लोकसभेमध्ये पराभूत झालेले उमेदवार आता राहता, संगमनेरमध्ये उभे राहण्याची बतावणी करत आहेत. अरे बाबा नगर दक्षिणमध्ये जनतेने चांगली दमछाक केली. लोकांनी आराम करण्यासाठी वेळ दिला. आता कुटुंबाला वेळ द्या. वाटलं तर व्यवसाय करा, असा मिश्किल टोला प्रभावती घोगरे यांनी भाजपच्या सुजय विखे यांना लगावला.

‘शिर्डी मतदारसंघात खोट्या केसेस दाखल करण्याचे सत्र’

राजकारण हे जनतेच्या विकासाचे झाली पाहिजे. मात्र शिर्डी मतदारसंघामध्ये दडपशाही आणि हुकूमशाहीचे राजकारणातून सध्या ॲट्रॉसिटी, विनयभंग खोट्या केसेस दाखल करून धाक निर्माण केला जात असून याविरुद्ध भाजप नेतृत्वाकडे दाद मागणार असल्याचे डॉ. पिपाडा यांनी म्हटले आहे.