माझ्या विजयात बाळासाहेब थोरात यांची श्रीकृष्णाची भूमिका; खासदार लंके यांनी व्यक्त केल्या भावना

मी अत्यंत सामान्य कार्यकर्ता असून संघर्षातून पुढे आलो आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपली लढाई बलाढ्य शक्तीशी होती. या महत्त्वाच्या लढाईत आमदार बाळासाहेब थोरात यांचा आपल्या विजयात सिंहाचा वाटा असून त्यांनी आपल्या विजयात श्रीकृष्णाची भूमिका बजावली, अशा भावना नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी व्यक्त करत थोरात यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अमृत उद्योग समूहाच्या वतीने खासदार लंके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लंके म्हणाले की, महाभारतात कौरव आणि पांडवांच्या युद्धात श्रीकृष्णाने अत्यंत मोलाची भूमिका बजावली तशीच भूमिका आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विजयात बजावली आहे. माझ्या विजयाचे खरे किंगमेकर आमदार थोरात आहेत. मी अत्यंत सामान्य कार्यकर्ता आहे.परंतु संघर्षातून पुढे आलो आहे.ज्येष्ठ नेते शरद पवार, आमदार बाळासाहेब थोरात यांचा विश्वास आणि जनतेची साथ यामुळे बलाढ्य शक्तीचा पराभव करण्यात यश मिळाले आहे. निवडणुकीमध्ये त्यांनी अनेक प्रकार केले. धमक्या दिल्या, गुन्हे दाखल केले, नागरिकांच्या बोटाला बाहेर शाई लावण्याचा प्रयत्न केला. असे अनेक गैरप्रकार करूनही जनतेने त्यांना साफ नाकारले, असेही लंके म्हणाले.आमदार बाळासाहेब थोरात यांची यंत्रणा अत्यंत निष्ठावंत आणि प्रामाणिक असून त्यांच्या मोलाच्या मदतीने हा विजय साकारला आहे. आगामी काळामध्ये जिल्ह्यात सर्वांना बरोबर घेऊन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेत महाविकास आघाडीच्या विजयासाठी सर्वांनी काम करायचे आहे,असे त्यांनी सांगितले.

आमदार थोरात म्हणाले की, नगर दक्षिणची लढाई ही श्रीमंत विरुद्ध गरीबाची होती. निलेश लंके सामान्य परिवारातील असून संघर्षातून पुढे आले आहे. कोरोना काळात त्यांनी उल्लेखनीय काम केले असून त्यांची लोकप्रियता मोठी होती. त्यांच्या लोकप्रियतेची धास्ती घेऊन विद्यमान सत्ताधाऱ्यांनी दडपशाहीचा वापर सुरू केला. जिल्ह्यात त्यांनी सत्तेचा गैरवापर करून संगमनेर पारनेरसह सर्वत्र दहशत निर्माण केली आहे.सत्तेचा वापर हा सामान्यांच्या विकासाऐवजी ते जिरवा – जिरवीचे राजकारण करून दडपशाही निर्माण करत आहे. संपत्ती, सत्ता, असतानाही आघोरी दहशत वापरामुळे जनतेने त्यांना नाकारले आहे. या उलट जीवाला जीव देणारी माणसे लंके आणि निर्माण केली आहे. लंके हे अभ्यास असून त्यांचा भविष्यकाळ उज्वल आहे. दिल्लीतही त्यांनी आपले कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटवावा असा आशावाद व्यक्त करताना जिल्ह्यामध्ये समविचारी लोकांना एकत्र घेऊन येणारी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था लढवू असेही ते म्हणाले.