राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान घरातच राहा! खासदार बद्रुद्दीन अजमल यांचे देशभरातील मुस्लिमांना आवाहन

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान देशभरातील सर्व मुस्लिमांनी घरातच राहावे तसेच देशात कुठेही ट्रेनने प्रवास करू नये, असे आवाहन आसामचे खासदार आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंटचे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांनी केले आहे. अलीकडेच कर्नाटकच्या काँग्रेस खासदाराने पुन्हा गोध्रा घडण्याची भीती व्यक्त केली होती. आता अजमल यांनी मुस्लिमांना घरातच राहण्याचे आणि ट्रेनचा प्रवास टाळण्याचे आवाहन केल्यामुळे देशभरातील मुस्लीम समाजात तणावाचे वातावरण आहे.

आपल्या लोकांना वाचवा, असे आवाहनही अजमल यांनी केले आहे. बाबरी मशीद पाडल्यानंतर प्रचंड हिंसाचार उफाळून आला होता आणि मुस्लिमांना बेदम मारहाण करण्यात आली होती. तशीच परिस्थिती राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त करतानाच मुस्लिमांनी घरातच सुरक्षित राहावे आणि राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान चार ते पाच दिवस ट्रेनचा प्रवास टाळावा, असे आवाहनही अजमल यांनी केले आहे. बारपेटा जिह्यात मदरशाच्या पायाभरणी सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून लाखो रामभक्त ट्रेन तसेच बसचा प्रवास करून अयोद्धेत पोहोचणार आहेत. अशा परिस्थितीत कुठलाही बिकट प्रसंग उभा राहू शकतो तसेच भयंकर घटना घडू शकते. त्यामुळे मुस्लिमांनी घरातच राहून शांतता राखावी, ट्रेनचा प्रवास टाळावा, असे आवाहन अजमल यांनी केले.

भाजपा मुस्लिमांचा द्वेष करत नाही
अजमल यांनी यापूर्वीही मुस्लिमांना घरात राहण्याचे आवाहन केले होते. यावर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी अजमल भाजपाचा भलेही द्वेष करोत, मात्र भाजपा मुस्लिमांचा द्वेष करत नाही. भाजपा त्यांच्यावर प्रेमच करते, सर्वधर्म समभाव यावर विश्वास ठेवते असे म्हटले आहे. रामजन्मभूमी प्रकरणातील मुस्लिम पक्षकार याचिकाकर्ते इकबाल अन्सारी हेदेखील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार आहेत, असे सांगतानाच बद्रुद्दीन अजमल आणि असुद्दीन ओवेसींसारखे लोक समाजात द्वेष पसरवण्याचे काम करतात, असा आरोपही गिरिराज सिंह यांनी केला आहे.