अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी जलदगतीने चौकशी करा! 18 नोव्हेंबरपर्यंत अहवाल द्या; हायकोर्टाचे आयोगाला आदेश

बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर मृत्यूप्रकरणी जलदगतीने चौकशी करा आणि 18 नोव्हेंबरपर्यंत चौकशी अहवाल सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी न्यायिक आयोगाला दिले. आयोगाने चौकशी करताना अक्षय शिंदेच्या वडिलांची बाजू ऐकून घ्यावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

अक्षय शिंदेला बनावट एन्काऊंटरमध्ये मारण्यात आले. कथित एन्काऊंटरचा विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) तपास व्हावा, अशी विनंती करीत अक्षय शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी सरकारतर्फे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी एकसदस्यीय न्यायिक आयोग नेमल्याची माहिती त्यांनी दिली. त्याची नोंद घेतानाच खंडपीठाने आयोगाला जलदगतीने चौकशी करून 18 नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

z सुनावणीवेळी न्यायालयाने सीआयडीमार्फत सुरू असलेल्या तपासाबाबत विचारणा केली. तसेच सर्व पुरावे न्यायवैद्यक तज्ञांद्वारे तपासण्याची आणि सुरक्षितरीत्या जतन करण्याची सूचना केली.

 आरोपी पाणी प्यायलेला ग्लास महत्त्वाचा पुरावा

आरोपी अक्षय शिंदे ज्या ग्लासमधून पाणी प्यायला होता तो एक महत्त्वाचा पुरावा असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. त्या ग्लासवरील बोटांचे ठसे घेतले का? ते ठसे तपासले का? असे प्रश्न खंडपीठाने महाधिवक्त्यांना विचारले. अक्षय शिंदेने पाणी मागितले होते. त्यामुळे त्याच्या हातातील बेडी काढली होती, असा दावा पोलिसांनी मागील सुनावणीवेळी केला होता.