भारतीय जनता पक्षाचे वाचाळवीर नेते, माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा घसरली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आष्टी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बबनराव लोणीकर यांनी मराठा समाजाला डिवचले आहे. मराठा समाजाची मतं कांड्यावर मोजण्या इतकी असल्याचे विधान लोणीकर यांनी केले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मराठा समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे.
बबनराव लोणीकर हे भाजपचे नेते आहेत. त्यांनी मंत्रीपदही भूषवले असून सध्या ते जालना जिल्ह्यातील परतूर-मंठा येथून भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या विधानामुळे नवा वाद पेटला आहे. मराठा समाजाकडून लोणीकर यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला जात आहे. सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, या विधानावरून राजकारण तापल्यानंतर लोणीकर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. एक व्हिडीओ शेअर करत लोणीकर यांनी खुलासा केला आहे. आष्टी गावामध्ये प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांशी बोलताना या गावात मराठा समाजाची मते कमी असल्याचे आपण म्हणालो, असे स्पष्टीकरण लोणीकर यांनी दिले. तसेच काही लोकांनी जाणीवपूर्वक आपला व्हिडीओ मोडतोड करून व्हायरल केल्याचा आरोपही त्यांनी केला.