Baba Siddique Murder – तिसऱ्या आरोपीची ओळख पटली, ‘शिवा’चे पुणे कनेक्शन उघड; आईने दिली धक्कादायक माहिती

माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तिसऱ्या आरोपीचीही ओळख पटली आहे. तिसऱ्या आरोपीचे नाव शिवा असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवा मूळचा उत्तर प्रदेशच्या बहराईचचा रहिवासी होता. त्याचे नाव शिवकुमार गौतम उर्फ शिवा आहे. शिवा आणि सहआरोपी धर्मराज कश्यप हे एकाच गावचे रहिवासी आहेत. दोघांचे वय 18-19 दरम्यान असून दोघेही पुण्यात भंगाराच्या कामात होते. दोघांचा कुठलाही गुन्हेगारीचा इतिहास नाही. दोघेसी सामान्य कुटुंबातले असून कुटुंबीयांच्या संपर्कात होते.

शिवा आधी पुण्यात भंगाराच्या कामात लागला. त्यानंतर शिवाने धर्मराजला पुण्यात बोलावून घेतलं. तीनही आरोपी 40 दिवसांपासून बाबा सिद्दीकी यांची रेकी करत होते. 2 सप्टेंबरला सर्व आरोपी कुर्ल्यात एका खोलीत भाड्याने राहिले होते. अटक केलेल्या आरोपींनी बाबा सिद्दीकी, झिशान सिद्दीकी यांच्या घराची आणि ऑफिसची रेकी केल्याची कबुली दिली.

शिवा पुण्यात भंगाराचे काम करत होता या वृत्ताला त्याच्या आईने दुजोरा दिला आहे. पण शिवा मुंबईत काय करत होता हे आपल्याला माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तो शेवटी होळीला मुंबईत आला होता. त्यानंतर तो आपल्याशी फोनवरही बोलायचा नाही असे शिवाच्या आईने सांगितले.