हॉरर युनिवर्समध्ये झळकणार रश्मिका मंदाना, आयुष्यमानसोबत करणार स्क्रीन शेअर

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका रश्मिका मंदाना आता चित्रपट निर्माता दिनेश विजन याच्या हॉरर युनिवर्समध्ये झळकणार आहे. चित्रपटात रश्मिकासोबत आयुष्यमान खुराना स्क्रीन शेअर करणार आहे. आयुष्यमान खुराना हॉरर युनिवर्समध्ये झळकणार असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरु होती. मात्र अखेर या चर्चेला पूर्णविराम लागला असून, आयुष्यमानसोबत रश्मिका या चित्रपटात अभिनय करणार असल्याचे निश्चित झाले आहे. ‘वैम्पायर्स ऑफ विजय नगर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. 2018 मध्ये श्रद्धा कपूर स्टारर स्त्री सिनेमापासून युनिवर्सची सुरूवात झाली. सध्या या युनिवर्सच्या ‘मुंज्या’ या सिनेमाने चित्रपटगृहात धुमाकूळ घातला आहे.

श्रद्धा कपूरसह राजकुमार राव, कृति सेनन आणि वरुण धवन आदि स्टार कलाकार हॉरर युनिवर्समध्ये आहेत. रणवीर कपूरसोबत ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या यशानंतर रश्मिकाला अनेक ऑफर येत आहेत. आयुष्यमानसोबत रश्मिका पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. दोघांच्या भूमिका आणि चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना आश्चर्यचकित करेल असा दावा निर्मात्यांकडून करण्यात येत आहे.

रश्मिका बॉलीवूडसह साऊथच्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या वर्षाअखेरीस तिचा ‘पुष्पा 2 : द रूल’ प्रदर्शित होणार आहे. यानंतर ती सलमान खानसोबत ‘सिकंदर’ सिनेमात स्क्रीन शेअर करणार आहे. शिवाय साऊथ सुपरस्टार धनुषसोबत ‘कुबेरा’ या सिनेमातही झळकणार आहे.