जगभरातून बातम्यांचा आढावा

अयोध्येतील मशिदीच्या जमिनीवर महिलेचा दावा
रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अयोध्येत मशीद बांधण्यासाठी निश्चित करण्यात आलेली जमीन आपल्या कुटुंबाची असल्याचा दावा दिल्लीतील राणी पंजाबी या महिलेने केला आहे. या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी ती सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. मात्र मशिदीच्या बांधकामासाठी स्थापन केलेल्या इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्टचे प्रमुख झुफर फारुकी यांनी राणी पंजाबीचे दावे नाकारले आहेत.

सुझुकीच्या दुचाकीमध्ये दोष; चार लाख गाडय़ा मागवल्या परत
स्कूटर आणि बाईकच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या सुझुकी या कंपनीने त्यांच्या 4 लाखांहून अधिक दुचाकी परत मागवल्या आहेत. यामध्ये मोटरसायकलबरोबरच स्कूटर्सचाही समावेश असल्याचे सुझुकी इंडियाने सांगितले. या बाईकमध्ये बसवण्यात आलेले हाय टेन्शन कॉर्ड सदोष असल्याने या गाडय़ा परत मागवण्यात आल्या आहेत. दुचाकीच्या इग्निशन कॉइलला कनेक्ट होणारी ही कॉर्ड सदोष असल्याने ती बदलून देण्यासाठी गाडय़ा रिकॉल केल्या आहेत.

अमेरिकेला रशियाचे प्रत्युत्तर
अमेरिका जर्मनीमध्ये तैनात करणार असणाऱया लांब पल्ल्याच्या आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांना प्रत्युत्तर म्हणून रशियाही नवीन क्षमतेची क्षेपणास्त्रs तैनात करू शकतो, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रविवारी सांगितले. 2026मध्ये क्षेपणास्त्र तैनात करण्याचा विचार अमेरिकेने व्यक्त केला आहे.

व्हॉट्सअॅप सेवा सुरूच राहणार
मेटाचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप सुरुच राहाणार असल्याची माहिती माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली. व्हॉट्सअॅप बंद करण्याबाबत मेटाने कुठल्याहीप्रकारची माहिती सरकारला दिलेली नसल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.