यूपीत भाजप सरकारची पुन्हा नाचक्की, राम मंदिरातील गळतीनंतर अयोध्येत आता 50 लाखांचे हजारो लाइट्स चोरीला

अयोध्येतील राम मंदिरात पावसाने गळती झाल्याचा प्रकार समोर आला होता. यामुळे उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर जोरदार टीका झाली होती. आता राम मंदिराकडे जाणाऱ्या रामपथ आणि भक्तीपथावरील हजारो लाइट्स चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गजबजलेल्या अयोध्येत चोरीचा प्रकार समोर आल्याने एकूणच संपूर्ण सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अयोध्येत राम पथावरच्या झाडांवर लावलेले बांबूचे तब्बल 3800 लाइट्स आणि भक्तीपथावरचे 36 प्रोजेक्टर लाइट्स चोरीला गेले आहेत. चोरीला गेलेले साहित्य 50 लाखांचे आहे. या प्रकरणी FIR दाखल झाला आहे. जवळपास दोन महिन्यांनंतर पोलिसांना चोरीची घटना लक्षात आली आहे. विशेष म्हणजे अध्येध्येतील सर्वाधिक सुरक्षित आणि महत्त्वाचे ठिकाण असलेल्या राम मंदिराजवळ ही चोरी झाली आहे.

अयोध्या विकास प्राधिकरणाने यश एंटरप्राइजेस आणि कृष्णा ऑटोमोबाइल्स यांना दिलेल्या कंत्राटानुसार राम मंदिराकडे जाणाऱ्या राम पथावरील झाडांवर 6,400 बांबू लाइट्स आणि भक्तीपथावर 96 गोबो प्रोजेक्टर लाइट्स लावण्यात आले होते. रामपथ आणि भक्तीपथावर लावण्यात आलेले 3800 बांबू लाइट्स आणि 36 गोबो प्रोजेक्टर लाइट्स चोरीला गेल्याचे कंपनीचे प्रतिनिधी शेखर शर्मा यांनी सांगितले.

लाइट्स चोरीला गेल्याचे समजल्यावर राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार लाइट्स चोरीला गेल्याचे मे महिन्यातच समोर आले होते. पण या प्रकरणी दोन महिन्यानंतर 9 ऑगस्टला एफआयआर दाखल झाला आहे. तक्रारीनंतर आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

अयोध्येतील नवनिर्मित रामपथ, भक्तीपथ, राम जन्मभूमी पथ आणि धर्मपथावर बांबू लाइट्स आणि गोबा प्रोजेक्टर लाइट्सने सजवण्यात आले आहे. राम जन्मभूमीपथ हा 12.97 किमीचा आहे. पथावरूनच भाविक रामललाच्या दर्शनासाठी जातात. या वेगवेगळ्या प्रकारचे लाइट्स लावून रोषणाई करण्यात आली आहे.