स्वयंपाकघर – चहाची परंपरा

<< तुषार प्रीती देशमुख

चहा म्हणजे फक्त चहा असतो. त्याला दुसरा तिसरा असा कोणताच पर्याय नसतो. दिवसाची सुरुवात चहाने झाली की, दिवस अगदी ताजातवाना तरतरीत जातो. दिवसभराची मेहनत करण्यासाठी स्फूर्ती देणारा हा चहा बनवून देणाऱ्या दवे कुटुंबाची ही कहाणी.

चहाची पावडर पाण्यामध्ये पडल्यावर जेवढी ती उकळते तेवढा त्या चहाचा आस्वाद छान लागतो, तसंच या दवे कुटुंबाच्या बाबतीत आहे. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चहाच्या व्यवसायासाठी समर्पित करून आयुष्याचा आनंद घेत आहेत.

गुजरातमधील एका गावामधून जयंतीलाल दवे वयाच्या 15 व्या वर्षी मुंबईत आले. परळ येथे त्यांच्या एका कुटुंबीयांच्या भोजनालयामध्ये यांनी एक वर्ष नोकरी केली. मग त्यांनी दादर येथील ‘चंद्रकांत टी हाऊस’मध्ये नोकरी करायचं ठरवलं. त्याप्रमाणे त्यांनी या चहाच्या दुकानात चहाची भांडी धुण्यापासून ते चहा विकण्यापर्यंतच्या कामगिरीला सुरुवात केली. दुकानाच्या समोर असलेल्या झाडाखाली ते कित्येक वर्षं राहिले आहेत, पण सगळं काही हसतमुखाने. हळूहळू त्यांनी चहा बनवायला सुरुवात केली. त्यांनी बनवलेला चहा ग्राहकांना आवडायला लागल्याचे पाहून त्यांचे मालक त्यांच्यावर खुश झाले व त्यांच्यावर चहा बनवण्याची कामगिरी सोपवली गेली. 1960 ते 1970 या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी ही सगळी जबाबदारी स्वीकारून स्वत:ला सिद्ध केलं. ‘चंद्रकांत टी हाऊस’ दुकानाच्या मालकांनी दुकान विकण्याचं ठरवलं तेव्हा जयंतीलाल दवे यांना ते दुकान विकत घेण्यासाठी आग्रह केला. स्वत:कडची सर्व जमापुंजी एकत्रित करून जयंतीलाल यांनी ते दुकान विकत घेतलं. त्या दुकानाच्या समोरील पालन सोजपाल चाळीत एक छोटीशी जागा विकत घेतली व आपल्या कुटुंबाला मुंबईत आणलं.

दवेजींनी त्यांच्या चहाच्या व्यवसायाला मेहनतीने नावारूपाला आणलं. त्यात त्यांना त्यांच्या पत्नीची मोलाची साथ लाभली. दुकानातल्या सगळ्या कामगारांसाठी दवेंच्या पत्नी घरून दुकानात भोजन पाठवायच्या. मिल कामगारांना सकाळच्या पहिल्या शिफ्टला जाताना चहाची सोय असावी या हेतूने त्यांनी दुकान पहाटे चार वाजता उघडायचं ठरवलं. सगळेच मिल कामगार आनंदी असायचे व त्यांच्याशी त्यांची घट्ट मैत्रीदेखील झाली होती. हळूहळू अनेक ग्राहक त्यांचे मित्र होत गेले. त्यामुळे त्यांची जनसंपत्ती प्रचंड प्रमाणात वाढली.

जयंतीलाल यांची दोन्ही मुलं भरत आणि हरीश लहानपणापासूनच मदत करण्यासाठी दुकानात यायची. वडिलांनी मुलांनाही चहा बनवण्याचं प्रशिक्षण दिलं आणि त्याप्रमाणे दोन्ही मुलं त्यात तरबेज बनले.

त्यांच्या दुकानात अनेक दिग्गज मान्यवर चहा पिण्यासाठी लांबून यायचे. अनेकांना ते ओळखत नसत. कारण टीव्ही कधी त्यांनी पाहिलाच नव्हता. ते राहत असलेल्या चाळीमध्ये एक सिनेदिग्दर्शक त्यांच्या दुकानात येऊन चहा पीत आणि त्या चाळीकडे पाहत सिक्वेन्स लिहीत असे. जेव्हा त्या चित्रपटाच्या चित्रिकरणाची वेळ आली तेव्हा त्यांना आपण कोणाशी बोलत होतो हे कळलं. तो दिग्दर्शक म्हणजेच आशुतोष गोवारीकर! ज्यांनी ‘पहिला नशा’ या चित्रपटाचं लेखन त्यांच्या दुकानात केलं होतं. असे अनेक चित्रपटांमधील नायक-नायिका त्यांच्याकडे चहा प्यायला यायच्या. मर्सिडीज, बीएमडब्ल्यू अशा मोठमोठ्या गाड्या त्यांच्या दुकानाच्या बाहेर आजही थांबतात तो गोल्डन चहा पिण्यासाठी.

गेली अनेक वर्षं तीच चहाची चव टिकवणं ही खरी खासियत आणि वडिलांच्या निधनानंतर या दोन्ही भावांनी ती टिकवून ठेवली आहे. आपले कामगार म्हणजेच आपलं कुटुंब या हेतूने दवे कुटुंबांनी ज्या कामगारांना मूलबाळ नाही अशा कामगारांना त्यांच्या एका वयानंतर वृद्धाश्रमात ठेवून त्यांची संपूर्ण जबाबदारीदेखील स्वीकारली आहे.

कोरोनाच्या काळात सेवा करणाऱ्या सेवकांना चहा पुरवण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. आजही दवेंच्या दुकानात पाच रुपयांना चहा मिळतो, तोही पूर्वीच्याच चवीचा. त्या चवीमध्ये कधीच बदल झाला नाही याचं कारण दोन्ही बंधू हेच सांगतात की, आम्ही आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवल्याप्रमाणे तीच चहाची पावडर, साखर आणि तेच चहाचे मसाले वापरतो. तसंच त्यात योग्य प्रमाणात आलं व गवती चहा टाकतो. त्यामुळे आमचा चहा कधी बिघडणारच नाही याची आम्हा दोघा भावांना खात्री आहे.

चहाचा व्यवसाय तसा बघायला गेला तर अगदी सामान्य व्यवसाय, पण त्यांना जेव्हा मी विचारलं की, हा व्यवसाय करताना तुम्हाला लाज नाही का वाटत? कधी त्याचा त्रास नाही का झाला? तेव्हा भरतदादांनी सांगितलं की, हा चहाचा व्यवसाय आम्हाला परंपरेने लाभला आहे. त्यामुळे वडिलांचे कष्ट आम्ही लहानपणापासून पाहिले आहेत. चहाच्या व्यवसायाला टिकवून ठेवणं हीच आमची जबाबदारी आम्ही समजतो. राहिला प्रश्न लाज वाटण्याचा, तर आम्ही बनवलेल्या चहाने ग्राहकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला खूप काही देऊन जातो.

चहाचा व्यवसाय सोपा नाही कारण त्यात अविरत मेहनत असते. चहा बनवताना प्रेमाने चहा बनवला तरच त्या प्रेमाची चव त्या चहामध्ये उतरते. ‘चंद्रकांत टी हाऊस’ हे चहाचं दुकान कधीच बंद नसतं. 365 दिवस सुरू असतं. चहासोबत याच दुकानात अनेक गप्पांच्या मैफली रंगतात. अनेकांची लग्नं ठरतात. अनेकांच्या स्वप्नातील घराचं प्लॅनिंग ठरतं. नाटकाची क्रिप्ट तयार होतं. चित्रपटाचे संवादही इथेच बसून लिहिले जातात. अनेक जण आपली सुखदुःखं इथेच चहा पिता पिता शेअर करतात.

भरतदादांच्या पुढच्या पिढीलादेखील या क्षेत्रामध्ये आवड आहे, पण त्यांना खाद्यपदार्थ बनवण्यामध्ये जास्त रस आहे. त्यामुळे चहाबरोबर पुढील काळामध्ये अनेक ग्राहकांना ‘चंद्रकांत टी हाऊस’ या ब्रँडमध्ये अनेक खाद्य पदार्थदेखील मिळतील अशी परमेश्वराकडे प्रार्थना करू. अशा या चहावाल्या दवे कुटुंबीयांना व त्यांच्यासारख्या सर्व चहा विक्रेत्यांना त्यांच्या कष्टासाठी मानाचा मुजरा!

[email protected]

(लेखक युटय़ूब शेफ आहेत.)