­­क्लासिक – दोन जगांच्या मधोमध!

<<< सौरभ सद्योजात

Sometimes your shadows, the darkest one, can devour you, and leave behind an emptiness so deep, so vast, that no one and nothing can feel it.

मानवाच्या आयुष्यात येणारी आणि खोलवर रुजली जाणारी काही दुःखं आयुष्यभर चिघळत असतात. कुठलीही बाह्य शक्ती ती पोकळी भरू शकत नाही. उदा. आपण एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो पण अशा व्यक्तीच्या सहवासाला अनेकवेळा मुकतो. अशावेळी जीवाला सुखावतील अशा स्वप्नरंजनांचे इमले आपण मनातल्या मनात उभे करतो आणि क्षणिकच पण सुखाचा चेहरा पाहतो. ते स्वप्न संपलं की परत दुःखाची पोकळी आपल्या स्वागताला उभीच असते. हारुकी मुराकामी या प्रभावी लेखनसम्राटाची अशी पात्रं जेव्हा जवळून भेटतात, तेव्हा ‘स्पुटनिक स्वीटहार्ट’ या त्यांच्या कादंबरीत जन्मलेलं हे वाक्य आपल्याला अधिक स्पष्टपणे उमगू लागतं.

‘स्पुटनिक स्वीटहार्ट’ ही मुराकामी यांनी लिहिलेल्या उत्तमोत्तम ग्रंथांपैकी एक. नितांत देखणी परंतु अस्वस्थ करणारी कादंबरी. कादंबरीचा सूत्रधार के, त्याचा जीव जिच्यावर जडला आहे ती सुमिरे आणि सुमिरे जिच्या प्रेमात स्वतःला शोधू पाहतेय ती मियू या तिघांची ही कथा. कथावस्तू म्हटलं तर अगदी सरळ सोपी आहे पण तिच्या लेखनाचं अधिष्ठान मुराकामी यांनी ‘Magical Realism’ (जादुई वास्तववाद) या लेखनशैलीवर ठेवल्यानं या कथेचा आशय आणि खोली अधिक गहिरी झाल्याचं आपल्या लक्षात येतं. वास्तविक जीवनातल्या घटना पण त्यात येणाऱ्या चमत्कृती, अतींद्रिय गोष्टी तिला वेगळं आणि देखणं वळण देतात. लेखनात उत्कंठेची भर पडते. काफ्का यांचं ‘मेटामॉर्फिसीस’, रश्दी यांची ‘मिडनाईटस् चिल्ड्रन’ आणि मार्कव्हेज यांची ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलीट्यूड’ असे अनेक महत्त्वाचे ग्रंथ याच जादुई वास्तववादाच्या कक्षेत मोडतात. ‘स्पुटनिक स्वीटहार्ट’ वास्तविक जीवनाच्या समांतर अजून एक जग (Parallel World) आपल्याला दाखवते. मुराकामी यांची ही तीन पात्रं त्या दुसऱ्या जगात आपलं स्वप्नरंजन उभं करतात, सुखाची कामना सत्यात उतरवतात. पण असं समांतर जग खरं की ती यांची स्वप्ने आहेत की वास्तवापासून दूर जाण्यासाठीची पळवाट हे वाचणाऱ्या व्यक्तीनेच ठरवलेलं उत्तम. मुराकामी यांच्या मांडणीची पद्धत अद्भुत असल्यानं ‘नेमकं कुठल्या निष्कर्षावर यायचं?’ हा खल करण्यातही एक मजा आहे. कारण कथा जसजशी पुढे सरकत जाते तसं वास्तव आणि स्वप्नवत जगाच्या मध्ये असणारी सीमा अधिक पुसट होत जाते. म्हणून कदाचित वास्तववादी लेखन वाचणाऱ्या अनेक वाचकांना हा उपप्रकार फारसा रुचत नाही हे ही खरं आहे.

मियू या संपन्न आणि वयाने मोठ्या अशा कोरियन स्त्रीच्या प्रेमात पडलेली सुमिरे तिच्यासाठी काम करू लागते. वाईनचा व्यवसाय असल्यानं त्या दोघींचे अनेक प्रवास एकत्र घडतात. ‘स्पुटनिक’ या रशियन शब्दाचा मूळ अर्थच आहे सहप्रवासी! ख्रया आयुष्यात मियू सुमिरेचा स्नेह नाकारते आणि सुमिरे ‘के’ या आपल्या मित्राचा! पण कदाचित दुसऱ्या समांतर जगात, तिथल्या आयुष्यात यांना हवं ते प्रेम मिळू शकणार आहे. सुमिरे मियूसह तर के सुमिरेसह एकत्र राहू, भटकू शकणार आहेत. असं सहप्रवासी असणं, होता येणं यातून या कादंबरीचं बारसं झालं असणार हे नक्की. शांत चित्ताने वाचताना हे नीटसं समजून येतं की खिळवून ठेवणारी चमत्कृती आणि प्रेमकथा हा या ग्रंथाचा केवळ सांगाडा आहे. मुराकामी यांनी मोठं तत्त्वज्ञान यात मांडून ठेवलं आहे. दुःखाची अनिवारता, अस्वस्थ वास्तवापासून तोंड फिरवण्याची मानवी वृत्ती, ‘स्व’ गमावलेली अवस्था आणि कधीतरी होत जाणारी ओळख या घटकांचं गंभीर मंथन यातून होतं. अनेकवार उत्कट आणि देखण्या स्वप्नांची तंद्री भंग पावते तेव्हा आत्ता हाताशी आहे त्या आयुष्याचं दुःख आपल्या अगदी अंगावर येतं. आता अशावेळी सावध असावं ही झाली सामान्य शिकवण. पण अनेकांना हा कर्मभाव अंमलात आणता येत नाही त्यांचं काय? मंगेश पाडगावकर म्हणतात…

अशा वेळी काय करावं?

सुकलेल्या झाडाला 

न बोलता पाणी द्यावं!

आणि मुराकामी त्याही पुढे जाऊन सांगतात की दुःख ही वस्तुस्थिती आहे आणि एखादं सोनेरी स्वप्न हा त्यावरचा उतारा! आणि या दोन जगांच्या कोलाहलात, अगदी मधोमध उभे असतो ते आपण!

(लेखक इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आहेत.)

[email protected]