कथा एका चवीची – सही सॅलेड

<< रश्मी वारंग

चमचमीत खाण्याचे दुष्परिणाम जाणवल्यावर सात्त्विक आहाराकडे वळणाऱ्या मंडळींना आधार देणारा पदार्थ म्हणजे सॅलेड. जगभरात सॅलेडचं महत्त्व विविध प्रकारे अधोरेखित केलेलं दिसतं. या पौष्टिक पदार्थाची ही कहाणी.

कच्च्या हिरव्या भाज्या खाणं हे मानवासाठी नवं नाही. आदिम मानवाला अग्नीचा शोध लागला नसताना तो सारं काही कच्चेच खात असे, पण याच भाज्या, मांस खारवण्याची कला त्याला अवगत झाली आणि त्यातून निर्माण झाला शब्द ‘सॅलेड‘ या शब्दाचं मूळ ‘सॅल’ या शब्दात आहे. ‘सॅल’ म्हणजे मीठ. त्यापासून हा ‘सॅलेड‘ शब्द अस्तित्वात आला. प्राचीन काळी पाश्चिमात्य देशांत कच्च्या भाज्या व्हिनेगर, मीठ आणि तेलाच्या वापरासह खाल्ल्या जात. हे सॅलेड जेवणात सर्वात आधी वाढले जाई. हिप्पोक्रेट्स आणि गॅलेनसारख्या वैद्यक तज्ञांचा असा विश्वास होता की, कच्च्या भाज्या सहजपणे शरीरातून खाली सरकतात आणि त्यानंतर खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांसाठी सुरळीत वाट तयार करतात. त्यामुळे सॅलेड प्रथम वाढावं असा संकेत निर्माण झाला. सॅलेडचे खूप सारे प्रकार अस्तित्वात आहेत.

ग्रीक सॅलेड शेतकऱ्यांचे खाणे ठरते. यात हिरव्या भाज्यांसह फेटा नामक चीजचा वापर होतो.

तर इस्त्रायल सॅलेड त्या देशातील सर्वाधिक आवडते खाद्य आहे.18व्या शतकात शेफ सॅलेड लोकप्रिय होते. तुमच्या स्वयंपाकघरात जे काही साहित्य उपलब्ध असेल ते या सॅलेडसाठी वापरले जाई. शेफच्या सॅलेडला ‘सलमागुंडी’ असेही म्हटले जाई. अनेक राजे, महाराण्यांना सॅलेड बेहद्द पसंत होते. त्या काळी शाही स्वयंपाकघरात काम करणारे शेफ एका विशाल भांड्यात पस्तीस भिन्न पदार्थ एकत्र करून सॅलेड बनवत असा उल्लेख आढळतो. या सॅलेडला किती प्रकारे सजवलं जाई? तर चक्क खाण्यायोग्य फुलांच्या पाकळ्यांचा वापरही केला जात असे.

हिंदुस्थानींच्या डोक्यात सॅलेड म्हणजे हिरव्या भाज्या हे पक्कं आहे, पण पाश्चिमात्य देशांत मासे, मांस, पास्ता, चीज, फळं या सगळ्यांचा वापर सॅलेडमध्ये केलेला असतो. हिंदुस्थानात फ्रूट सॅलेड हा प्रकार नवा नाही. अमेरिकेत डिनर सॅलेड आवडीने खाल्लं जातं. या सॅलेडमध्ये चिकन किंवा स्टेकचे, मांसाचे छोटे तुकडे असतात. अनेकदा त्यात विविध प्रकारच्या चीजचा समावेश असतो.

हिंदुस्थानींसाठी सॅलेड ही संकल्पना नवी नसली तरी सॅलेडपेक्षा कोशिंबीर हा प्रकार जास्त परिचयाचा आहे. हिंदीत ती कचुंबर असते, तर दक्षिण भारतात कोसंबरी. त्यातूनच मराठी ‘कोशिंबीर’ शब्द तयार झाला आहे. मात्र दक्षिण हिंदुस्थानी कोसंबरीत कडधान्यांचा वापर करतात आणि चक्क स्नॅक्सचा भाग म्हणून ती खाल्ली जातात. हिंदुस्थानी सॅलेडमध्ये प्रचंड वैविध्य आढळतं. कारण इथल्या हवामानामुळे पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भाजी, फळफळावळ यांचं विलक्षण वैविध्य आहे. सध्याच्या काळात डाएटचं महत्त्व वाढत असताना सॅलेड डाएट हा प्रकार लोकप्रिय होतोय. जर कच्च्या किंवा कमी शिजवलेल्या भाज्या वापरून आहार मर्यादित करायचा असेल तर अनेक शेफ त्यासाठी वैविध्यपूर्ण पाककृती सुचवतात. आहार तज्ञांच्या मते सॅलेड मार्गावर जाण्याचा विचार करत असाल तर सर्वात ताजं आणि सर्वात रंगीबेरंगी स्थानिक उत्पादन शोधा. त्यात भाज्या, फळे, धान्य, कडधान्यं आणि काजू यांचं वा असं कोणतंही मिश्रण वापरता येतं. चाट मसाला, काळं मीठ (रॉक सॉल्ट), लिंबाचा रस, दही, कोथिंबीर-पुदिना चटणी, चिंच चटणी यांचा वापर करून सॅलेड किंवा कोशिंबीर बनवली तर मुख्य जेवणाचा विसर पडावा असं मस्त, हलकं आणि पौष्टिक खाल्ल्याचा आनंद नक्कीच मिळेल. ताटात डावं-उजवं करताना वाढलेल्या चमचाभर कोशिंबिरीपासून डाएट म्हणून वाडगाभर सॅलेड खाण्यापर्यंतचा प्रवास खूप काही सांगून जातो.

पौष्टिक आहारासाठी सॅलेडची निवड म्हणूनच सही ठरते.

(लेखिका आरजे स्तंभलेखिका आहेत.)