भटकंती – पाचूचे बेट बार्बाडोस

<<< निमिष पाटगावकर

बार्बाडोसला संध्याकाळी तुम्ही फेरफटका मारलात तर दिवसभर काम करून आलेले आपल्या घराच्या व्हरांड्यांत बीअर पीत बसलेले तुम्हाला प्रत्येक घरात दिसतील. इथल्या निळ्याशार फसफसणाऱ्या समुद्रासारखी इथली माणसेही अशीच उत्सहात फसफस असतात. सुरुवातीला त्यांची थोडी भीती वाटते, पण एकदा का तुम्ही त्यांच्यात मिसळलात की जीवन हे फार सोपे आहे हे जाणवते. अत्यंत कमी गरजा, पण अत्यंत आनंदात जगणारी या पृथ्वीतलावर दुसरी जमात नसेल.

वेस्ट इंडीज या नावाचा माझ्या लहानपणी नुसता उच्चार केला तरी धडकी भरायची. डोळ्यासमोर उभे राहायचे ते त्यांचे प्रचंड दहशत निर्माण करणारे क्रिकेटपटू. यांच्याविरुद्ध क्रिकेट खेळायचे म्हणजे बाकीच्या देशातल्या क्रिकेटपटूंचे काय होत असेल या विचाराने थरकाप उडायचा. त्या वेळी वेस्ट इंडीज दौरा म्हटले की काही खेळाडू आपोआप अनफिट व्हायचे आणि जरी कुणी तिथे पोहोचले तरी सलामीला जायची टाळाटाळ करायचे. या दहशतीबरोबर अर्थात होता तो आदर. या महान खेळाडूंच्या भूमीत जायची माझी इच्छा या विश्वचषकाच्या निमित्ताने पूर्ण झाली. ज्याला आपण वेस्ट इंडीज म्हणतो तो आहे अनेक देशांच्या बेटांचा समूह. यात 13 स्वतंत्र देश आहेत आणि तीन विभागात सामावलेले अजून 19 देश आहेत. अर्थात क्रिकेटचा संबंध असलेले बार्बाडोस, अँटिगा, त्रिनिदाद अँड टोबॅगो, सेंट ल्युसिया, जमैका आणि गयाना हे प्रमुख देश. यातला गयाना हा दक्षिण अमेरिकेच्या खंडात येतो आणि तीन बाजूंनी इतर देशांनी वेढला आहे पण बाकीचे सर्व देश म्हणजे विधात्याने भरसमुद्रात केलेली रत्नांची उधळण. सुंदर समुद्रकिनारे, माडांची झाडी, उत्तम ताजे मासे, बीअर आणि एकंदरीत सर्व सुशेगाद असे गोव्याची आठवण करून देणारे आयुष्य इथली मंडळी जगत असतात. आजचा दिवस मजेत गेला म्हणजे सार्थकी लागला तेव्हा कशाला उद्याची बात? हे तत्त्व इथली मंडळी मनोमन पाळतात.

अटलांटिक महासागरावरून जाताना विमानाच्या खिडकीतून पांढऱया शुभ्र वाळूची किनार असेलला एक हिरव्या पाचूचा खडा अचानक दिसायला लागतो. जेव्हा पायलटने सांगितले, आपण बार्बाडोसच्या ब्रिजटाऊनला उतरत आहोत तेव्हा वरून हे इतके सुंदर दिसते तर खाली वावरताना किती सुंदर असेल हा विचार मनात येतो. भारतातून इतके तास प्रवास करून आणि घड्याळाच्या काट्याची उलटसुलट करून पोहोचल्यावर बार्बाडोसच्या विमानतळावर उतरल्यावर पहिल्यांदा जाणवते ते म्हणजे आपण पुन्हा मुंबईच्याच हवेत आलो आहोत. हवा जरी मुंबईची असली तरी मुंबईची धकाधक नाही. मोठ्या विमानतळासारखे इथे एरोब्रिजही नाहीत. बार्बाडोस, त्रिनिदाद, सेंट ल्युसिया या देशांना भारतीयांना व्हिसा लागत नाही. तेव्हा इमिग्रेशन ही एक निव्वळ औपचारिकता असते. विमानतळावर मला उतरवून घ्यायला तिथले एक स्थानिक आले होते. माझ्याकडे सामन्याआधी फिरायला दोन दिवस होते. त्यामुळे माझे बार्बाडोस फिरायचे प्लॅनिंग तयार होते.

भारतीय क्रिकेटमध्ये जे मुंबईचे स्थान आहे तेच वेस्ट इंडीज क्रिकेटमध्ये बार्बाडोसचे आहे. विस्डेन या क्रिकेटच्या बायबलने एकदा सार्वकालीन उत्तम असा बार्बाडोसचा कसोटी संघ काढला होता. या बार्बाडोसच्या सर्वोत्तम संघात सलामीला होते
गॉर्डन ग्रिनीज आणि डेसमंड हेन्स. आजही क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीची जोडी म्हणून यांचे नाव घेतले जाते. माझ्या तिथल्या यजमानांनी मला प्रथम सर प्रॅंक वॉरेल यांचे घर दाखवले. अगदी छोटेखानी घरात जन्मलेले वॉरेल समोरच्या मैदानातच खेळत मोठे झाले. हे वेस्ट इंडीजचे पहिले काळे कर्णधार होते. वॉरेल, विक्स, वॉलकॉट या विडिंजच्या प्रसिद्ध थ्री डब्ल्यूज्नी वेस्ट इंडीज क्रिकेटला प्रतिष्ठा मिळवून दिली तेव्हा यांचे योगदान अतुलनीय आहे. याच्या पुढचा टप्पा होता तो अर्थातच सर गारफिल्ड सोबर्स यांच्या घराचा. त्यांचे मूळ घर मी जेव्हा बघितले तेव्हा आजूबाजूची वस्ती ही अतिशय गरीब लोकांची दिसली. त्यांच्या शेजाऱयाशी गप्पा मारताना कळले की, सोबर्स इतके महान असून दौरा संपवून या गल्लीत आले की, अगदी साधेपणाने राहत. आता त्यांनी दुसरे आलिशान घर घेतले आहे, पण इथल्या घरातील संस्कारांमुळे त्यांचे पाय अजून जमिनीवरच आहेत. आजच्या तरुणाईत प्रसिद्ध असलेल्या गायिका रिहानाचे घर पाहिल्यावर आम्ही एका चर्चपाशी आलो, या चर्चच्या आवारात महान गोलंदाज माल्कम मार्शल याने वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी चिरनिद्रा घेतली आहे. ज्याने आयुष्यभर नवा चेंडू हाताळला त्याला देवाकडे जातानाही नवा चेंडू बरोबर दिला गेला. त्याच्या कबरीवर एक नवा चेंडू कायमचा ठेवला आहेच, पण त्याच्या लहान मुलांनी वडिलांसाठी लिहिलेली श्रद्धांजली चटका लावणारी होती.

बार्बाडोसची यात्रा इथली थ्री डब्ल्यूज् युनिव्हर्सिटी बघितल्याशिवाय पूर्ण होत नाही. या तीन महान खेळाडूंच्या नावाने ही युनिव्हर्सिटी आहे आणि त्याला जोडूनच प्रथम दर्जाचे सामने होतील असे प्रशस्त क्रिकेटचे मैदान आहे. या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे वॉरेल, विक्स, वॉलकॉट यांनी आपल्या खेळायच्या दिवसात अनेक एकत्र खेळ्या केल्या, पण निवृत्त झाल्यावरही ते एकमेकांच्या जवळ होते. यात सर फ्रँक वॉरेल यांना अवघे 42 वर्षांचे आयुष्य लाभले आणि 1967 साली त्यांचे निधन झाले. वॉलकॉट 2006 साली वारले तर विक्स 2020 साली वारले, पण या तीन मित्रांनी आपले पुढचे आयुष्यही एकत्र काढायचे आधीच ठरवले होते. यामुळे या तिघांच्या कबरीही इथे एकत्रच आहेत. सहसा जिवंत असताना कुणी आपल्या कबरीची जागा राखून ठेवत नाही, पण वॉरेल यांच्या निधनानंतर, वॉलकॉट यांना तिथेच चिरनिद्रा दिल्यावर, विक्स यांनी आपली कबरीची जागा जिवंतपणीच राखून ठेवली. इथली भूमी ही क्रिकेटची देवभूमी आहे आणि निसर्गाने दोन्ही हाताने भरभरून केलेली उधळण बघायला तुम्हाला आयुष्यात एकदा तरी इथे यायलाच पाहिजे.