मनतरंग – ‘न’चा ‘स’

<< दिव्या नेरुरकरसौदागर

स्वत:च्या अतार्किक नकारात्मक परिणाम करणाऱ्या विचारांमध्ये अडकून पडण्याऐवजी त्यातून बाहेर पडण्याचा विचार करायला हवा.  ‘कारात्मकतेवरकारात्मकरीत्या काम करणं शक्य असतं. त्यासाठी आधी स्वत:ला एक पाऊल उचलणं गरजेचं असतं.

“रडणं बंद कर गं आता…’’ मिताच्या रोजच्या रडण्याला परेश (दोघांचीही नावे बदलली आहेत) वैतागला होता. त्याचा चढलेला पारा बघताच मिता अजूनच रडायला लागली. “बंद कर म्हण, पण मला समजून नको घेऊस…’’ रडत रडत ती त्याच्या अंगावर ओरडली.

“काय करू समजून घेऊ म्हणजे? तुझं रोजचं झालंय. एवढ्या-तेवढ्याने तुझे डोळे गळायला लागतात. च्यायला, मी कामावरून घरी आलो की, तुझा रडका चेहरा फक्त माझ्या स्वागताला असतो. आता घरी यावंसंच मला वाटत नाही.’’ परेशही आता चांगलाच भडकला होता. “मग मरूनच जाते मी.’’ मिता निकराचं बोलली आणि बेडरूममध्ये निघून गेली. तेवढ्यात परेशच्या मोबाइलवर ऑफिसचा कॉल आला आणि विषय तिथेच थांबला.

दुसऱ्या दिवशी सकाळी चहा घेतानाही दोघे गप्पच होते. “नाश्ता बाहेरून ऑर्डर करू या का?’’ परेशला घरातील शांतता, मिताचं गप्प बसणं सहन होत नव्हतं. “तुला काय करायचंय ते कर,’’ मिता एवढं बोलून उठली तेवढ्यात परेशने तिचा हात पकडून तिला पुन्हा खाली बसवलं. मिताचे डोळे पुन्हा भरले. या वेळेस मात्र परेश शांत होता.

“आय अॅम सॉरी परेश. मला पण नाही आवडत रे असं रडूबाई होणं. बट आय फील दॅट आय अॅम हेल्पलेस,’’  मिताने त्याला एका दमात सांगितलं. “मला तुझी अवस्था कळतेय,’’ असं म्हणत परेशनेही तिची माफी मागितली.

या प्रसंगातलं हे जोडपं तरुण होतं आणि त्यांच्या लग्नाला पाच वर्षं झाली होती. उच्च मध्यमवर्गीय गटातील हे दोघं पहिल्या तीन वर्षांपर्यंत राजा-राणीसारखा संसार करत होते. परेशला नोकरीमध्ये बढती मिळाली आणि त्यांना मुंबई सोडावी लागली. ते दोघंही आता बंगळुरूमध्ये वास्तव्याला होते. पण मिताच्या कंपनीची शाखा तिथे नसल्याने तिला नोकरीवर पाणी सोडावं लागलं. इथेच कुठेतरी मिताचा आत्मविश्वास कमी व्हायला लागला. परेश कामाला निघून गेल्यावर त्याला परतायला बऱ्याचदा रात्र व्हायची. दिवस मिताला खायला उठायचा. सुरुवातीला तिने नोकरीसाठी प्रयत्न करून पाहिले, पण ते असफल झाले. मग तिने ते सगळं सोडून दिलं आणि समाज माध्यमांवर वेळ घालवू लागली.

व्हॉटस्आप, फेसबुक तसंच इन्स्टाग्रामवर तिला तिच्या शाळा-कॉलेजच्या मित्रमैत्रिणींचे तसंच ऑफिसमधल्या कलिग्जचे अपडेट्स, त्यांचे स्टेटस आणि सक्सेस स्टोरीज दिसायला लागली. हे सर्व बघताना तिच्या मनात ‘मी काहीच करत नाही’ आणि ‘माझ्या बरोबरचे सगळे पुढे गेले आहेत’ असे न्यूनगंड निर्माण करणारे विचार जोर धरू लागले. तिला स्वत:ची इतरांबरोबर तुलना करण्याची सवय लागली. त्यातच परेशलाही प्रमोशन मिळाल्याने तो कामात जास्त बिझी झाला.

दोघंही समुपदेशन घेण्यास (विशेषत: मितासाठी) आले होते. तिने अश्रूंचा बांध थोपवून ठेवल्याचे तिच्या देहबोलीतून जाणवून येतच होतं. परेशने ही सर्व परिस्थिती व्यवस्थित सांगितली आणि मिताच्या वारंवार रडू येण्याबद्दल चिंता व्यक्त केली. तो हेही सांगताना म्हणाला, “आधी ही खूप स्ट्राँग होती. अजिबात रडत नव्हती. काही झालं तरी व्यवस्थित असायची. आताच का रडत राहते कळत नाही.’’

“मिता आताही स्ट्राँगच आहे,’’ असं म्हटल्याबरोबर मिताने चमकून बघितलं आणि थोडीशी हसली. “रडू येणं ही कमजोरी नाही. ही एक सामान्य प्रतिक्रिया आहे. आपल्याला आनंद झाला की, हसायला येतं हे जसं सामान्य आहे तसं दुःख झाल्यावर रडू येणं ही दुःख या भावनेतून निर्माण झालेली प्रतिक्रिया आहे.’’

“तुमचं खरं आहे मॅम, पण रोज रोज रडायला येणं आणि तेही पूर्ण वेळ असेल तर?’’ परेश उपहासानेच म्हणाला, “आम्ही बंगलोरला रहायला गेलो. कंपनीचा फ्लॅट आहे. घरची सांपत्तिक स्थिती चांगली आहे. मिता म्हणेल ती गोष्ट घरात येते. तिला अजूनपर्यंत मी हिशेब विचारलेला नाही. अगदी तिच्या बँक अकाऊंटमध्ये मी रेग्युलरली पैसे टाकत असतो. वेळही देत असतो.’’ परेश सांगतच होता.

“मी त्याबद्दल नाराज नाहीये परेश,’’ मिता पटकन म्हणाली, “मला स्वतबद्दलचा आत्मविश्वास गमावल्यासारखं वाटतंय आणि मला ब्रेक थ्रूही मिळत नाहीये. त्याचा त्रास सतत होत असतो.’’ मिता आता तिच्या समस्येकडे हळूहळू पोहोचत होती.

मिताची समस्या जरी वरकरणी दिसायला सामान्य आणि साधी वाटत होती तरी तिला कंगोरे भरपूर होते. म्हणूनच परेशने त्याच्या पद्धतीने जे काही उपाय तिला सांगितले होते (बिझी रहा, मन गुंतव) ते सर्व असफल ठरले होते आणि सरतेशेवटी ते दोघं समुपदेशनाच्या माध्यमाकडे वळले होते.

मिताशी वैयक्तिकरीत्या बोलताना स्पष्ट जाणवत होतं की, ती स्वत:ला एकटी आणि असुरक्षित समजत होती. याचं प्रमुख कारण होतं की, तिला तिच्या आईवडिलांची कमतरता जाणवत होती. तिचे आई-वडील हे मुंबईला होते आणि मिता त्यांच्यावर भावनिक पातळीवर अवलंबून होती. त्यांचं जवळ असणं हे तिच्या मनाला सुखावणारं होतं, पण जशी ती परेशबरोबर बंगलोरला गेली तशी ती पटकन आधारहीन झाली. तिला आधार गेल्यासारखं वाटायला लागलं. त्यात भर म्हणजे जेव्हा ती समाज माध्यमांवर तिच्या शाळा-कॉलेजचे मित्र-मैत्रिणी पाहू लागली तेव्हा “हे लोक कसे एकटे स्वत:ला एस्टॅब्लिश करतात आणि मी का नाही?’’ ही तुलना तिला अजून दुखावू लागली. तुलना, स्वत:च्या आई-वडिलांवर अति अवलंबून असणं आणि भिडस्त स्वभाव यामुळे तिला सतत नकारात्मक विचारांची सवय लागत गेली होती. मिताला हे सगळंच अयोग्य आहे, असं जरी जाणवत असलं तरी त्यातून (नकारात्मक विचार) बाहेर पडणं अशक्य वाटत होतं. त्यामुळे ‘मला काहीतरी नक्कीच झालंय आणि जर मी एकटी असताना मला काही झालं तर कसं होईल?’ ही अनाठायी चिंता तिच्या डोक्यात घर करून बसली होती.

सर्वप्रथम मिताच्या चिंतेवर (Anxiety) काम करावं लागलं. ही भावना कशी निर्माण झाली याच्या खोलात जाणं गरजेचं होतं. मिताच्या आई-वडिलांनी तिला खूपच जपलेलं होतं आणि तिला ते लग्नानंतरही लहान मूलच समजत होते. त्यामुळे तिला बिनधास्त करण्याऐवजी ते तिला कायम कुठल्याही निर्णयामागचे धोकेच जास्त निदर्शनास आणून देत. याचा परिणाम म्हणजे मिता सगळेच निर्णय आई-वडिलांवर अवलंबून ठेवू लागली होती. तिला यातून परावृत्त करण्यासाठी तिच्या अतार्किक विचारांवर काम सुरू झालं. तिला ‘निर्णयक्षमतेचं’ तंत्र शिकवलं गेलं. याबरोबरच परेशलाही या गोष्टी समजावण्यात आल्या, ज्यायोगे घरी तो स्वत तिच्या साथीला असेल. मिता आता स्वतचे निर्णय हळूहळू चुकत घ्यायला लागली. तसंच स्वतला काही आवडीच्या गोष्टींमध्ये स्वत:ला गुंतवून घेऊ लागली. काही दिवसांतच याचा सकारात्मक परिणाम तिच्यावर दिसायला लागला. मिताची देहबोली बदलली होती आणि तिने स्वत:ला कष्टपूर्वक बाहेर काढायचं ठरवलेलं होतं.

आज बऱ्याचशा मिता आहेत, ज्या स्वत:च्या अतार्किक नकारात्मक परिणाम करणाऱ्या विचारांमध्ये अडकून पडलेल्या आहेत. त्या सर्वांना एकच सांगावंसं वाटतं, ‘न’कारात्मकतेवर ‘स’कारात्मकरीत्या काम करणं शक्य असतं. त्यासाठी आधी स्वत:ला एक पाऊल उचलणं गरजेचं असतं.

[email protected]

(लेखिका मानसोपचारतज्ञ समुपदेशक आहेत.)