सिनेमा – विलक्षण वेगळा… हसीन दिलरुबा

<< प्रा. अनिल कवठेकर

नावात काय असतं, असं शेक्सपिअरने म्हटलेलं आहे. पण तरीही एखादं नाव वाचल्यानंतर किंवा वारंवार स्क्रीनवर पाहिल्यानंतर ते नेमकं काय आहे, हे जाणून घेण्याचा मोह होतो. इतकं त्या नावाचं माहात्म्य आपल्या मनामध्ये कसं तयार होतं? हे माहीत नाही. असंच हसीन दिलरुबाबाबत म्हणता येईल. गाण्यांच्या ओळी चित्रपटाच्या शीर्षकात वापरण्याच्या ट्रेंडमधलं हसीन दिलरुबाहे टायटल घेऊन आलेला हा चित्रपट आहे.

ज्वालापूर नावाच्या नदीकाठी वसलेल्या शहरात घडणारी ही घटना. नदीला लागून असणाऱ्या इमारती हा देखील या चित्रपटाचा एक मोठा रहस्यमय भाग आहे. चित्रपट सुरू होतो तेव्हा नायिका राणी कश्यप (तापसी पन्नू) कुत्र्यांना मांसाचे तुकडे टाकताना दिसते आणि क्षणभरातच तिच्या मागे असणाऱ्या घरात स्फोट होतो. ते तिचंच घर असतं, ती घरात शिरते. त्या पेटलेल्या घरात एक तुटलेला आणि पेटलेला हात तिला दिसतो आणि ‘हसीन दिलरुबा’ ही रोमँटिक कथा असेल या भ्रमाला चांगलाच धक्का बसतो. पोलिसांचा कयास असतो की, स्फोट होण्याआधीच त्या व्यक्तीला मारलं असावं. कारण त्याच्या डोक्यावर घाव दिसतो. पण स्फोट इतका जबरदस्त असतो की, त्या व्यक्तीचं शरीर संपूर्ण जळून गेलं आहे आणि फक्त हाताचा भाग शिल्लक आहे. ज्यावर रानी हे नाव गोंदवलेलं आहे आणि फ्लॅशबॅक सुरू होतो.

रिशू (विक्रांत मेस्सी) जेव्हा पहिल्यांदा मुलगी पाहायला जातो तेव्हा राणी बाल्कनीतून त्याला पाहत असते. तो तिला पाहताक्षणी तिच्या प्रेमातच पडतो. यावरून त्याच्या साध्या सरळ स्वभावाची कल्पना प्रेक्षकांना येते. राणीला ज्वालापूर हे शहराचं नाव आवडलेलं नसतं. पाहण्याच्या कार्यक्रमात दोघे एकांतात भेटण्यासाठी किचनमध्ये जातात. मला वाटतं हा पहिलाच चित्रपट असेल, ज्यात नायक-नायिका किचनमध्ये भेटतात. रिशूची अवस्था तपोभंग झालेल्या ऋषीसारखी असते. समोर मेनका उभी आहे आणि आपण काय बोलावं हे त्याला सुचत नसतं. तीच एकटी बडबड करते. स्वतःच्या आवडीनिवडीबद्दल भरभरून सांगते. पहिल्याच भेटीत क्राइम नॉव्हेलबद्दल सांगते. तो त्याचे छंद सांगता… सुट्टीत इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेअर करणं. तो हे असलं काही सांगेल हे तिला अपेक्षित नसतं. कारण तिच्या मनातला राजकुमार खूप वेगळा असतो आणि हा तर खूपच सामान्य, बावळट वाटतो. म्हणून ती त्याला किचनमधला बंद पडलेला फॅन रिपेअर करायला सांगते. वॉशरूमला जाण्याच्या निमित्ताने त्याची आई किचनमध्ये डोकावते आणि तिला मुलगा टेबलावर बसून फॅन रिपेअर करत असल्याचं दृश्य दिसतं. शितावरून भाताची परीक्षा. आईच्या लक्षात येतं ही मुलगी आपल्या मुलाला मॅच होणार नाही. पण त्याला तीच मुलगी पसंत आहे. त्याचा आत्मविश्वास पुढे जाऊन आत्मघात ठरणार असतो.

चित्रपटाच्या सुरुवातीला झालेल्या धमाक्याला राणी जबाबदार असल्याचा संशय इन्स्पेक्टरला असतो. दोन महिन्यांपासून तो तिची चौकशी करत असतो. ती सगळी कथा इन्स्पेक्टरला सांगायला सुरुवात करते. तिला ज्वालापूर हे नाव आणि ते शहरच पहिल्यापासून आवडलेलं नसतं. विवाहानंतर ती घरी येते तेव्हा जोरदार पाऊस त्यांचं स्वागत करतो आणि तिला तो पाऊस नकोसा वाटतो. रिशूचे कोणतेही मित्र, बँडवाला स्वागतासाठी आलेले नसतात. ती चेंज करेपर्यंत पावसाचं पाणी घरात आलेलं असतं. रिशू ते कपड्याने पुसतो. ती अंगावर पांघरूण घेऊन झोपते. पहिल्या दिवशी साडेदहा वाजता उठते आणि सासू तिला पकोडे बनव असं सांगते. राणी स्पष्टपणे येत नसल्याचं सांगते. यातला सासू-सुनेचा संघर्ष आधुनिक आणि मजा आणणारा आहे.

राणी रिशूकडे पाहून प्रेमाचे इशारे करते, पण त्याला ते कळत नाही. पहिल्याच दिवशी ती त्याला वेगवेगळ्या शब्दांनी झापते. तो तिला प्रत्युत्तर देऊ शकत नाही. खडसावू शकत नाही. कारण त्याचं अंतकरणापासून तिच्यावर प्रेम आहे. त्याला ती खूप आवडलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत ती दुखावली जाऊ नये म्हणून तो तिने क्षणोक्षणी केलेला अपमान सहन करतो. ती सुंदर आहे. ती माझी आहे यातच त्याला सुख आहे. ती त्याला लव मॅरेज आणि अरेंज मॅरेजमधला फरक सांगते. काही न करता एक सुंदर मुलगी प्राप्त होणं म्हणजे अरेंज मॅरेज! कोणतीही मेहनत नाही की पटवावं लागत नाही. हॉटेलमध्ये घेऊन जावं लागत नाही. सिनेमा दाखवावा लागत नाही. फिरायला न्यावं लागत नाही. तो हतबल होतो. कदाचित त्याला पश्चाताप होत असतो. एखाद्या खडूस शिक्षिकेला विद्यार्थी जसे घाबरतात आणि वर्गात प्रवेश करतात तशी त्याची घरात प्रवेश करताना दयनीय अवस्था होते. त्याची आई पाहात असते. मित्र त्याला समजावतो की बायकोबरोबर कसं वागायला पाहिजे. तिची आई आणि बहीण तिला नवऱ्याशी कसं वागावं याबद्दल समजावतात. त्याला तुझ्या प्रेमात पाड. ती पदर पाडते आणि हा पळून जातो. त्याने तिला दम दिला की तिचा पदर खाली आणि याची हवा उडते. यामुळे तिची होणारी कुचंबणा, ‘ज्वालापूर मे कोई ज्वाला नही जलनेवाली,’ हा तिचा संवाद सगळं सांगून जातो.

ती स्पष्टवक्ती, मॉडर्न आहे आणि तो वेंधळा, गोंधळलेला, बावळट आहे. जोडी जमणार कशी? हसीना दिलरुबा मिळणं सोपं आहे, पण तिच्याबरोबर अनुभव घेणं प्रत्येकाला जमत नाही. अशा न जमणाऱ्यांपैकी रिशू आहे. तो तिला टाळायला लागतो. ती त्याला खुलवण्याचे अनेक प्रयत्न करते. ती त्याला एका मुलीबरोबर पाहते. तेव्हा याच्यात काही दम नाही असं तिला सांगते. तो पहिल्यांदा आग्रेसिव्ह होतो. हनिमूनची तिकिटं फाडून टाकतो आणि दोघांच्या भांडणात नील (रिशूचा दूरचा भाऊ) या उमद्या तरुणाचा प्रवेश होतो. पॉकेटबुक्स वाचन हा राणीसारखा त्याचाही छंद आहे. उघड्यावर व्यायाम करणारा नील, तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार वाटतो. ती त्याच्याकडे ओढली जाते.

चहा न बनवणारी राणी नीलने सांगितल्यावर चहा बनवते. यूट्युब पाहून स्वयंपाक करते. तिच्यातला हा फरक नीलसाठी असल्याचं घरच्यांच्या लक्षात येत नाही. नीलच्या प्रेमात बुडालेल्या राणीचं पाऊल घसरतं. एक दिवस नील न सांगताच निघून जातो. त्या वेळी तिला जाणीव होते की, तो तिला सोडून पळाला आहे. एका स्त्रीच्या मनातल्या संवेदनांची विलक्षण कथा आहे. ती स्पष्ट असल्यामुळे ती नवऱ्याला नीलबद्दल सांगते. पोलीस जेव्हा तिला विचारतो की, तुला हे असं विवाहबाह्य संबंध ठेवण्यात पश्चाताप होत नाही का? तेव्हा ती म्हणते की, नाही. नील भेटल्यामुळेच मला खरा रिशू कसा आहे ते समजलं. इथून एक वेगळा ट्विस्ट चित्रपटात येतो.

तापसी पन्नूने या तीन वेगवेगळ्या व्यक्तिरेखांना अतिशय दमदार पद्धतीने सादर केलं आहे. पहिली हसीन दिलरुबा अतिशय सुंदर, प्रफुल्लित, मनमोकळी पाहताक्षणी प्रेमात पडावी अशी तरुणी. दुसरी नीलच्या प्रेमात पडल्यानंतर प्रेमाने त्याच्यासाठी सगळं करणारी आणि हे करण्यामागे रिशू आपल्याला प्राप्त व्हावा ही भूमिका ठेवणारी एक मध्यमवर्गीय तरुणी. तिसरी पोलिसांनी तिला वारंवार जबाबासाठी बोलावल्यानंतरही त्यांना कणखरपणे उत्तरं देणारी. नीलच्या भूमिकेत हर्षवर्धन राणे भाव खाऊन जातो. रिशूच्या भूमिकेत विक्रांत मेस्सीला त्याच्यातील रूपांतर प्रभावीपणे दाखवता आलेलं नाही. त्याच्याही भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. पण त्याने पहिला मूड शेवटपर्यंत तोच धरून ठेवला आहे. रिशूचा तिरस्कार एका उच्च पातळीपर्यंत जातो पण रिशूला तो चेहऱ्यावर काही सीन्समध्ये दाखवता आला नाही. रिशूने एकदा आपल्याला माफ करावं म्हणून तिने केलेला प्रयत्न तसंच सासुबाईंना प्रेमाने जिंकणं… इथपर्यंतचा भाग फ्लॅशबॅकमध्ये उलगडतो.

इन्स्पेक्टर किशोर रावतला खात्री आहे की, हा खून राणी आणि तिच्या प्रियकराने मिळून केलेला आहे. पण इन्स्पेक्टरने घेतलेल्या लाय डिटेक्टर वगैरे सगळ्या परीक्षांमध्ये ती यशस्वी होते. कारण दिनेश पंडितची पॉकेट बुक्स तिने वाचलेली आहेत. ती वाचूनच ती इतकी धाडसी झालेली आहे. राणीच्या केसला पाच वर्षं लोटतात. त्या काळात किशोर रावतची बदली होते आणि तो बदलीच्या ठिकाणी जाताना बुकस्टॉलवर दिनेश पंडित यांचं पॉकेट बुक विकत घेतो. राणीचा जबाब घेताना अनेक वेळा राणीने त्या पुस्तकाचा उल्लेख केलेला असतो. ट्रेनच्या प्रवासात रात्रभर तो ते पॉकेट बुक वाचून काढतो आणि जेव्हा त्याला शेवट कळतो तेव्हा तो मोठ्याने हसतो.

शेवटच्या वीस मिनिटात फ्लॅशबॅकमध्ये नेमकं काय घडलं हे पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी जी कल्पना केलेली आहे, तसं काहीच घडत नाही. प्रेक्षकांच्या मताला शंभर टक्के धक्का देत एक वेगळा शेवट पाहायला मिळतो आणि हे केवळ दिनेश पंडित यांच्या पॉकेट बुक्समुळे घडू शकतं, असं मांडण्याचा प्रयत्न ‘हसीन दिलरुबा’ने केलेला आहे. ज्यांना मर्डर मिस्टरी आवडते आणि त्यातील मर्डर कोणी केला याचा अंदाज बांधायलाही आवडतं अशा रसिकांकरिता हा चित्रपट एक चांगली मेजवानी आहे. कितीही अंदाज केला तरी या चित्रपटाचा शेवट नेमका काय हे कोणालाही अंदाज बांधता येत नाही, इतका विलक्षण वेगळा आहे.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)