गुलदस्ता – काव्यमय प्रेमकहाणी, साहिर लुधियानवी – अमृता प्रीतम

<<< अनिल हर्डीकर

जगात तरुण जिवांचं परस्परांवर प्रथमदर्शनी प्रेम जडलं असेल व पुढेही अनंतकाळ होत राहील; पण प्रथमदर्शनी जडलेलं प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत निभावणाऱ्या प्रेमकथा विरळाच. त्यात साहिर-अमृताच्या प्रेमकहाणीचा निसंशयपणे समावेश करावा लागेल एवढी ती रोमहर्षक व काव्यमय प्रेमकहाणी आहे.

या जगात रोज किती असफल प्रेमकहाण्या जन्माला येतात आणि विरून जातात! अशा कहाण्यांची कोण कशाला मोजदाद ठेवतंय?

दोन प्रेमी जीव आयुष्यभर झुरत राहतात, पण एकत्र येणं त्यांच्या भाळी नसतं. कारणं काहीही असो. कधी दोघांमधली आर्थिक विषमता, कधी धार्मिक बंधने, कधी खानदानाची इज्जत तर कधी कौटुंबिक विरोध!

हीर-रांझा, शिरीन-फरहाद, लैला-मजनू यांच्या प्रेमकथा अमर झाल्या, कारण ते कधी लग्नाच्या बंधनात अडकले नाहीत, असं गमतीनं म्हटलं जातं. कुणास ठाऊक! ते लग्नबंधनात अडकले असते तर? जर-तरला काही अर्थ नाही हेच खरं!

प्रेम करावं, भले त्यात अपयश येवो, पण कधी प्रेम करूच नये असं होण्यापेक्षा ते बरं! प्रेम कोणत्याही क्षेत्रात होतं, पण चर्चा, बातम्या, वावड्या मात्र ऐकू येतात झगमगणाऱ्या सिनेसृष्टीतल्या. प्रत्येक ऐकणारा ते सांगताना थोडं तिखट-मीठ लावायला विसरत नाही.

आज मी तुम्हाला हिंदी चित्रपटसृष्टीतल्या ज्या एका गीतकाराच्या प्रेमकहाणीबद्दल, त्या दोघांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगणार आहे तो कमालीचा लोकप्रिय आणि ताकदीचं लिहिणारा शायर, हर इक पल का शायर साहिर लुधियानवी! ह्याच्यावर लुब्ध झालेली होती एक पंजाबी कवयित्री अमृता प्रीतम. हे प्रेम दुतर्फा होतं. दोनों तरफ आग बराबर लगी हुई थी… आणि तरीही ते कधीही एकमेकांचे झाले नाहीत. दोघेही प्रतिभावान आणि मनस्वी. स्वतचं विश्व जपणारे. त्यांची भेट तशी नाट्यपूर्ण वगैरे नव्हती. चारचौघांसारखे ते एका मैफिलीत भेटले. पण त्यांचे जे एकमेकांशी त्यानंतर भावबंध जुळले ते मात्र अनाकलनीय!

साहिर दिसायला अगदी साधा. उंच, सावळा. त्याच्या गडगंज श्रीमंत बापाने साहिरच्या आईचे अतोनात हाल केले. साहिरची अम्मी आणि साहिर देशोधडीला लागले. साहिरला अम्मीविषयी प्रचंड प्रेम.

कॉलेजात असताना एका हिंदू मुलीच्या प्रेमात तो पडला होता. ईशर चौधरी असं त्या पोरीचं नाव होतं. ती घरच्यांचा विरोध झुगारून आयुष्यभराची साथ देण्याच्या तयारीने साहिरपर्यंत पोहोचली, पण ‘मदर फिक्सेशन’ असलेल्या साहिरने तिला स्वीकारलं नाही. शब्दांवर हुकूमत असलेल्या जादूगाराने प्रेम आणि विरह ह्या दोन्ही भावना उत्कटपणे आपल्या शायरीत गुंफल्या.

अमृता नितांतसुंदर होती. तिच्या सौंदर्याचं वर्णन एका पुस्तकात असं वाचायला मिळतं. अमृता प्रीतम ही संगमरवरात घडवलेली स्त्री होती. जर तिच्यावर एखाद्या शिल्पकाराची नजर पडली तर तो तिच्यातून एक सुबक मूर्ती घडवू शकेल, जी आज मंदिरात राधा म्हणून पुजली जाईल. अमृता ही तशी त्या काळाच्या मानाने पुढारलेल्या विचारांची आणि जात्याच बंडखोर, तितकीच संवेदनशील, भावुक. कवितेच्या व शब्दांच्या दुनियेत रमणारी. साध्यासुध्या आणि साहित्याशी अजिबात संबंध नसणाऱ्या नवऱ्यापासून बौद्धिक आणि साहित्यिक अनुरूपता नाही, म्हणून अमृता त्या वेळी लाहोरमध्येच वेगळी राहात होती. सातत्याने लेखन करत होती. उपजीविकेसाठी रेडिओ केंद्रावर निवेदिकेची नोकरी पण करत होती. ती पंजाबीतून कविता करत असे. कथा, कादंबरी लिहीत असे.

मैत्रीतला संकोच कमी झाल्यावर एकदा तिने साहिरला आपल्या घरी बोलावलं. तिच्या स्त्रीसुलभ अगत्याने आणि ऊबदार आतिथ्याने साहिर सुखावला होता. गप्पागोष्टी करताना त्यांना वेळेचं भान उरलं नाही. मग त्यांच्या वरचेवर भेटी होणं सुरू झालं. शांतता आणि मंद काळोखात ते तासन्तास निशब्द बसून असत. एवढी शांतता की परस्परांचे मंद श्वास – नि:श्वासही जाणवायचे व त्यातून परस्परांच्या मनाच्या गाभाऱ्यात शिरायचे.

एका अर्थाने त्यांचे नाते लोकविलक्षण होते. तो सिगारेटीमागून सिगारेटी ओढे. त्या हवेत सोडलेल्या धूम्रवलयांकडे ती पाहात राहायची. तो गेल्यावर राहिलेल्या अर्ध्या सिगारेटी आपल्या बोटांमध्ये धरून त्यात अमृता त्याचा स्पर्श शोधायची. प्रीतनगर, अमृतसर आणि लाहोर दरम्यानचं एक छोटं गाव. जिथे 1944 साली केव्हा तरी एक उर्दू व पंजाबी कवींचा मुशायरा आयोजित केला होता. त्याचं साहिरला आमंत्रण होतं, तसं अमृतालाही. या मुशायऱ्यातच दोघांची प्रथमच जवळून भेट झाली आणि त्यांच्या नजरेने परस्परांना पसंती दिली, दाद दिली. ती एका शायरची एका कवयित्रीला दाद होती. एका प्रतिभेने दुसऱ्या प्रतिभेला केलेला सलाम होता. त्याहीपेक्षा एका प्रेमव्याकूळ जिवाची दुसऱ्या प्रेमतृषार्त मनाला घातलेली साद होती.

यापूर्वीही जगात तरुण जिवांचं परस्परांवर प्रथमदर्शनी प्रेम जडलं असेल व पुढेही अनंतकाळ होत राहील. पण प्रथमदर्शनी जडलेलं प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत निभावणाऱ्या प्रेमकथा विरळाच. त्यात साहिर-अमृताच्या प्रेमकहाणीचा निसंशयपणे समावेश करावा लागेल एवढी ती रोमहर्षक व काव्यमय प्रेमकहाणी आहे.

मैंने जिस वक्त तुझे पहले-पहले देखा था

तू जवानी का कोई ख्वाब नजर आई थी

हुस्न का नग्म – ए – जावेद हुवी थी मालूम

इश्क का जब्बा – ए – बेताब नजर आयी थी

(मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं, तू तारुण्याचं स्वप्न वाटली होतीस. सौन्दर्याचं कायम स्मरणात राहणारं काव्य वाटली होतीस, प्रेमाचं बेचैन मन वाटली होतीस.)

ह्या साहिरच्या ओळी त्या पहिल्या भेटीने तर साहिरला सुचल्या नसतील?

[email protected]