इंग्लंडची मोहीम फत्ते केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा गड सर करण्यासाठी गेलेल्या पाकिस्तानला पहिल्याच एकदिवसीय सामन्यात संघर्षानंतर पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यापुढे पाकिस्तानची फलंदाजी 203 धावांत ढेपाळली होती तर या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचाही पाकिस्तानने घामटा काढला. अखेर कर्णधार पॅट कमिन्सच्या झुंजार खेळाने ऑस्ट्रेलियाला सलामीच्या लढतीत 2 विकेटनी निसटता विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानला दणदणीत सलामीची अपेक्षा होती, पण पाकिस्तानी गोलंदाजांचा मारा थोडक्यात कमी पडला. 204 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हारीस रऊफने अचूक मारा करत ऑस्ट्रेलियाची 7 बाद 155 अशी दयनीय अवस्था केली होती. अवघ्या 25 षटकांतच ही अवस्था झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला 149 चेंडूंत फक्त 49 धावा हव्या होत्या. तेव्हा कर्णधार पॅट कमिन्सने झुंजार खेळ करत आधी सीन अबॉटसह 30 धावांची आणि नंतर मिचेल स्टार्कसोबत 19 धावांची संयमी भागी रचत ऑस्ट्रेलियाला 30व्या षटकातच विजय मिळवून दिला. कमिन्सने 31 चेंडूंत फटकावलेल्या 32 धावांमुळेच ऑस्ट्रेलियाला मालिकेत विजयी सलामी देता आली. ऑस्ट्रेलियाच्या डावात स्टीव्हन स्मिथ (44) आणि जोश इंग्लिस (49) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 85 धावांची महत्त्वपूर्ण भागी केली. मात्र ही एकमेव भागी वगळता ऑस्ट्रेलियाचे आघाडीवीर पूर्णपणे अपयशी ठरले होते.
तत्पूर्वी मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानचे सलामीवीर तग धरू शकले नाहीत. बाबर आझम आणि कर्णधार मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. बाबरने 44 चेंडूंत 37 धावा केल्या. तर रिझवानने 71 चेंडूंत 44 धावांची खेळी करून पाकिस्तानच्या डावाला आकार दिला. मधल्या फळीत सलमान आगा (12), कामरान गुलाम (5) अपयशी ठरल्यामुळे पाकिस्तानचा अर्धा डाव 101 धावांतच गडगडला होता. मात्र त्यानंतर इरफान खान (22), शाहीन शाह आफ्रिदी (24) आणि नसीम शाह (40) यांच्या फटकेबाजीमुळे पाकिस्तानला 200 धावांचा टप्पा गाठता आला. नसीमने 4 षटकारांची आतषबाजी केल्यामुळे पाकिस्तानला दोनशेची मजल मारता आली. तरीही पाकिस्तानचा डाव 46.4 षटकांत 203 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने 33 धावांत 3 तर कमिन्स आणि झम्पाने प्रत्येकी 2 विकेट मिळवल्या.