जाता जाता महाभ्रष्ट युती सरकारची महाउधळपट्टी, सरकारी जाहिरातींसाठी टेंडर मागून टेंडर: अतुल लोंढे

भारतीय जनता पक्ष, शिंदे सरकारचे शेवटचे दिवस राहिल्याने घाईघाईने जेवढे लुटता येईल तेवढे लुटण्याचे काम सुरु आहे. मंत्रिमंडळ बैठकीत कोट्यवधी रुपयांची टेंडर मंजूर करून मलिदा लाटण्याची लगीनघाई सुरु आहे. डिजीटल प्लॅटफॉर्मवर जाहिरातीसाठी राज्य सरकारने 90 कोटी रुपयांचे टेंडर काढले असून पाच दिवसांत हे 90 कोटी रूपये खर्च करायचे आहेत. मंत्रिमंडळाचे निर्णय जनतेपर्यंत SMS द्वारे पाठवण्यासाठी 23 कोटींच्या दुसऱ्या टेंडरलाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. जाता जाता महाभ्रष्ट युती सरकार जनतेच्या पैशांची महाउधळपट्टी करत असल्याचा, हल्लाबोल काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, राज्यावर आठ लाख कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज आहे तरिही सरकार मात्र टेंडर काढा आणि कमिशन घ्या या धोरणानुसार बेफाम होऊन उधळपट्टी करत आहे. मंत्रिमंडळ बैठकीत घेतले जाणारे निर्णय जनतेपर्यंत एसएमएसद्वारे पाठवण्यासाठी हे सरकार 23 कोटी रुपयांची उधळपट्टी करत आहे, या SMS साठी टेंडर मागवले जाणार आहे. आधीच लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीसाठी 450 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. तसेच या कार्यक्रमासाठी सरकारी तिजोरीतून पैसे खर्च करुन इव्हेंटबाजी केली जात आहे. या योजनेच्या कार्यक्रमातून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार त्यांच्या पक्षाचा प्रचार करत आहेत. अवघ्या अडीच वर्षांच्या काळातच भाजपा शिंदे सरकारने महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा केला आहे असे लोंढे म्हणाले.