पाच जिल्ह्यांत मतदार यादीत बोगस नावे घुसवण्याचा प्रयत्न, बनावट आधार कार्डचा वापर; निवडणूक आयोग हायअलर्टवर

विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस मतदारांची नावे मतदार यादीत घुसवण्याचे मोठे षड्यंत्र उघडकीस आले आहे. तुळजापूरपाठोपाठ नाशिक, धुळे, राजूर आणि वाशीम जिल्ह्यातही मतदारयादीत बोगस नावे घुसवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणा सतर्क झाली आहे. बनावट आधार कार्डचा वापर करून नावे घुसवण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये मतदार यादीत बोगस मतदारांची नावे घुसवण्याची तक्रार महाविकास आघाडीने केली आहे. या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी तुळजापूरमध्ये मतदार यादीत बोगस मतदारांची नावे उघडकीस आल्यानंतर आता अन्य चार-पाच जिल्ह्यांमध्येही असा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग हायअ‍ॅलर्टवर आला आहे.

एकाच आधार कार्डाचा वावर करून ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नावे घुसवण्याचा प्रयत्न आहे. या मतदारसंघांमध्ये नवीन मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी येणाऱ्या ऑनलाईन अर्जांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. या अर्जांची व्यवस्थित पडताळणी केली असता जोडलेल्या आधार कार्डमध्ये नामांकन क्रम हा एकसारखा दिसून आला. तसेच आधार कार्डवरील डिजिटल सहीमध्ये दिनांक व वेळ एकसमान असल्याचे आढळून आले. आधार कार्डवरील फोटो सारखेच आहेत, मात्र त्यावरील नावे वेगवेगळी आहेत.

मतदान केंद्रस्तरीय नोंदणी अधिकाऱ्यांनी या व्यक्तींची पडताळणी केली, पण अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर संबंधित व्यक्ती आढळून आली नाही. त्यामुळे अर्ज नामंजूर करण्यात आला. बोगस मतदार म्हणून मतदार यादीत नाव घुसवण्यासाठी बनावट आधार कार्ड तयार करून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अ‍ॅपवर नोंदणी करून ऑनलाईन बनावट कागदपत्र सादर करून केंद्रीय निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याची तक्रार निवडणूक आयोगाच्या वतीने दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर निवडणूक आयोगाने इतर जिह्यांवरही लक्ष केंद्रित केले आहे.

तपास लागणे अवघड ऑनलाईन अर्जाद्वारे बोगस मतदार म्हणून मतदार यादीत नाव घुसवण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने उधळून लावला आहे. पण यामागे नक्की कोण आहे याचा शोध घेणे कठीण असल्याचे सांगण्यात येते. कारण ऑनलाईन अर्ज सादर केल्यामुळे नक्की कोणत्या भागातून अर्ज अपलोड करण्याचा प्रयत्न झाला याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान तपास यंत्रणांसमोर असल्याचे सांगण्यात येते.