झोपेची गोळी दिली नाही म्हणून मेडिकल कर्मचाऱ्यावर हल्ला, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद

डॉक्टरांची औषधाची चिठ्ठी नसतानाही झोपेच्या गोळीची मागणी करणाऱया पिता-पुत्राने ती न देणाऱया मेडिकल विक्रेत्यावर रॉडने हल्ला केल्याची घटना खोणी पलावा येथे घडली. या बेदम मारहाणीची घटना सीसीटीव्हीत पैद झाली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हल्लेखोर पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक करोडिया हे खोणी पलावा फेज 2 मध्ये लेकसाईडमध्ये राहतात. लेकशोर ग्रीनमधील संजीवनी मेडिकलमध्ये रात्री 10.30 च्या सुमारास दीपक करोडीया, त्यांचा मुलगा दर्शन यांच्यासह हे गेले होते. दुकान बंद करण्याचे काम मेडिकलमधील नोकर करत होता. दीपक यांनी मेडिकलमध्ये काम करणारा कर्मचारी अजय याच्याकडे झोपेची गोळी मागितली. त्यांच्याजवळ डॉक्टरांची औषधाची चिठ्ठी नव्हती, तरीही ते गोळी मागत होते. यावेळी अजय याने दुकानात झोपेची गोळी नाही असे सांगताच दीपक यांना राग आला.त्यांनी अजयला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दीपक आणि त्याचा मुलगा दर्शनने दुकानात शिरून तेथे असलेल्या वायपरच्या लोखंडी रॉडने अजयला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अजय यांना गंभीर दुखापत झाली आहे.