सिनेमा – खिळवून ठेवणारा महाराजा

>> प्रा. अनिल कवठेकर

तिकीट काढून चित्रपट पाहावा आणि चित्रपटाचा आनंद घ्यावा असं समीकरण असणाऱ्यांसाठी हा चित्रपट मुळीच नाही. तुम्ही जर जागे नसाल तर तुम्हाला हा चित्रपट कळणार नाही की यात वर्तमान काळ चालू आहे की, भूतकाळ! पडद्यावर भूतकाळ फ्लॅशबॅक पद्धतीने दाखवला जातो. तो न दाखवता, तसं न सांगता, ज्या पद्धतीने चित्रपटाची दृश्ये जोडली आहेत, ते एक अप्रतिम प्रकारचे एडिटिंग आहे. अनेक वेळ, अनेक दृश्ये गोंधळात टाकतात, खिळवून ठेवतात, भीतीचा थरार देतात, रहस्यामागील रहस्ये रहस्यमय रीतीने सांगतात… असा आहे विजय सेतुपतीचा अप्रतिम ‘महाराजा’ चित्रपट.

पडद्यावर जेव्हा ‘महाराजा’ हे शीर्षक दिसते तेव्हा त्या शीर्षकामध्ये वस्तरा उघडतो. तो सहजासहजी न दिसता नीड पाहिल्यावर दिसतो. कारण या चित्रपटाचा नायक एक केशकर्तनकार आहे. छोटय़ा शहरामध्ये एका सलूनमध्ये काम करणारा, मख्ख चेहऱ्याचा, कधीच न हसणारा, अबोल पण आपल्या मुलीवर अत्यंत प्रेम करणारा महाराजा नावाचा हा नायक आहे.

दुकानात गिऱ्हाईक नाही म्हणून मालक आणि छोटा नोकर गाण्यांच्या भेंडय़ा खेळत आहेत. महाराजावर नंबर आल्यानंतर हा ‘कल छुट्टी चाहिये मुझे’ असे म्हणतो. तेव्हा मालक म्हणतो, ‘असले कोणते गाणे नाही.’ अशा प्रकारचे छोटे-छोटे विनोद यात भरपूर आहेत. पण त्यासाठी सावध असायला हवं. नाहीतर संवाद निसटून जायचे. हा चित्रपट सहजपणे पाहताच येत नाही. कारण जे दृश्य आधी आहे त्याचा संदर्भ अगदी शेवटी येतो. आधी दृश्य अपूर्ण दाखवलं आहे, शेवटी ते पूर्ण दाखवलं आहे. त्यामुळे आधी पाहिलेलं दृश्य मनावर परिणाम करतं. कदाचित तोच परिणाम दिग्दर्शकालाही हवा आहे. त्यामुळे आपला गोंधळ उडतो आणि आपल्याला गोंधळात टाकणं हाच या चित्रपटाचा मुख्य हेतू आहे.

महाराजा हा आपली मुलगी ज्योती बरोबर राहणारा एक सामान्य माणूस आहे. त्याची मुलगी माझा बाप कसा आहे ते सांगते. अभ्यासात तिची गती साधारण आहे; पण खेळामध्ये ती अव्वल आहे. ती शाळेच्या स्पोर्ट इव्हेंटसाठी आठवडय़ासाठी शहराबाहेर जाते. शाळेच्या दप्तरामध्ये दारूची बाटली सापडली म्हणून तिच्या वडिलांना बोलावलं जातं. महाराज तिथे शांत मुद्रेने उभा राहतो आणि सांगतो की माझी मुलगी असं करणार नाही याची मला खात्री आहे; पण संस्थाचालक तिला अद्वातद्वा बोलतात. तिला शाळेतून काढून टाकणार असल्याचं सांगतात. तेवढय़ात एक शिक्षिका एका मुलाला घेऊन येते व त्याने हा गुन्हा केला आहे ज्योतीने नाही असं सांगते. तेव्हा महाराज संस्थाचालकांना विनंती करतो की माझ्या मुलीला तुम्ही खूप बोललात. तिचा अपमान केला. तेव्हा तिची माफी मागा. त्याचं हे बोलणं संस्थाचालकाल धक्का देतं तसंच प्रेक्षकांनाही देतं. खूप वाद होतो. चालक त्याच्या बॉडीगार्डना महाराजाला बाहेर फेकायला सांगतो. तेव्हा तिथे असणाऱया लोखंडी खांबाला महाराजा धरून ठेवतो. सहा-सात लोक त्याला ओढतात पण तो जागचा हलत नाही. त्याची ताकद पाहून सगळेच हबकून जातात. ज्योती तिच्या सरांना विनंती करते, सर माझी माफी मागा नाहीतर खांब उखडून निघेल. संस्थाचालकाच्या लक्षात येतं आणि तो ज्योतीची माफी मागतो. प्रकरण शांत होतं. कथेमधील हे दृश्य प्रेक्षकांसाठी नवं असतं. महाराजाच्या शक्तीची ओळख करून देतं.

महाराजाच्या घरातल्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. महाराजा एका ठिकाणी बेशुद्ध पडलेला असतो. खिडकीतून एक नाग येतो. तो नाग हे दृश्य आपल्याला दाखवतोय असं दिग्दर्शन आहे आणि दृश्य इथेच संपतं. त्यानंतर दुसरं दृश्य… एका सर्विस सेंटरमध्ये एक गुंड मॅनेजरला मारतो; कारण त्याचा गॉगल कार सर्विसिंगला दिली असताना चोरीला गेलेला असतो. तो मॅनेजर त्याला समजावून सांगत असताना त्या गाडीची सर्विस करणारा येतो. तो गुंड त्यालाही मारतो. आता पोलीस स्टेशनमधले दृश्य सुरू होते. तिथे आलेल्या एका चोराचे नाव पोलीस आहे. त्याच्यावर स्कुटी चोरण्याचा आरोप आहे. तो तिथे येऊन सांगतो, मला मारा आणि खांबाला धरून उभा राहतो.त्याच वेळी काळपट गडद चेक्सचा शर्ट आणि कानाला बँडेज लावलेला महाराजा त्याची तक्रार द्यायला येतो. तो लक्ष्मी चोरुला गेली असल्याचं सांगत सगळी कथा डिटेलमध्ये सांगतो. लक्ष्मीचा आकार दाखवतो. तिथे हजर असलेल्यांना लक्ष्मी त्याची बायको किंवा मुलगी असल्याचं वाटतं. पण लक्ष्मी हा कचऱयाचा डबा असतो. माझ्या घरातला कचऱयाचा डबा चोरीला गेल्याचं तो म्हणत नाही. चित्र दाखवल्यावर तो एक कचरा डबा असल्याचं पोलिसांच्या लक्षात येतं. डब्यात सोनं नसताना कचऱयाचा डबा चोरण्यासाठी तीन चोर तुझ्या घरात आले याचं पोलिसांना आश्चर्य वाटतं. ते कंप्लेंट लिहून घेत नाहीत. त्याला मारहाण करतात. पुन्हा तेच शक्ती प्रदर्शन. एका मोठय़ा लोखंडी सपोर्टवर मांडणी असते. त्या लोखंडी सपोर्टला हा पकडतो. सहा-सात पोलीस त्याला ओढतात पण तो अजिबात जागचा हलत नाही. शेवटी ती मांडणी खाली पडते. त्या मांडणीवर असलेल्या एका माठातून तोच नाग बाहेर पडतो. सगळे पोलीस बाहेर पळून जातात आणि हा हातात नाग घेऊन बाहेर येतो. दृश्य संपतं.

पोलीस स्टेशनमध्ये सगळा धुरळा उडालेला आहे. पुन्हा तेच दृश्य महाराजा इन्स्पेक्टर समोर बसलेला आहे. घटाघटा अर्धी बाटली पाणी पितो आणि आधी सांगितलेली लक्ष्मीच्या चोरीची कथा सांगतो. या दृश्यात गांभीर्य असूनही त्या गांभीर्यात गंमत आहे. या चित्रपटांमध्ये पाच ते सहा वेळा जेवणाचं दृश्य आहे आणि प्रत्येक दृश्यात चिकन खाणारी माणसं दिसतात. चोर इतके विक्षिप्त आहेत की, ज्यांच्या घरी चोरी करतात त्यांच्या घरी ते चिकन बनवून खातात आणि जाताना त्या घरच्यांना संपवून जातात.

महाराज पुन्हा पोलिस स्टेशनमध्ये येतो आणि पोलीस इन्स्पेक्टरला चाळीस हजार रुपये देतो, मला लक्ष्मी पाहिजे. मी अजून पाच लाख रुपये द्यायला तयार आहे. कचऱयाच्या डब्यासाठी पाच लाख रुपये द्यायला तो तयार आहे. तेव्हा आपण त्याचा कचऱयाचा डबा शोधत असल्याचं नाटक करायचं आणि त्याच्याकडून पैसे उकळायचं इन्स्पेक्टर आणि त्याचे सहकारी ठरवतात.

दुसरीकडे सेलवा (अनुराग कश्यप) आणि त्याचे मित्र एका घरात चोरी करतात. त्या घरातील महिलांना बांधून ठेवतात. तरुण मुलीवर बलात्कार करतात आणि तिथला गॅस सिलेंडरचा स्फोट घडवून निघून जातात. तिथून एक वस्तू सेलवा घेतो. ती आपल्या मुलीला देतो. तिला ती आवडत नाही. तो घरातल्या कचऱयाच्या डब्यात ती वस्तू टाकतो. त्या कचऱयाच्या डब्यावर कॅमेरा स्थिर होतो. हाच तो कचऱयाचा डबा जो महाराजाच्या घरातून चोरीला गेलेला आहे.

पोलिस स्टेशनमध्ये महाराजाची अवस्था अगदी कुत्र्यासारखी करून टाकलेली असते. कोणाला चहा दे, सिगारेट आणून दे, त्यांच्या गाडय़ा पूस शिवाय सारखं मारही खा. तरीही तो रोज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसतो. सर्वजण त्याला कचऱयाचा डबा नावाने हिणवतात आणि त्याच्या कानाखाली मारतात.

अचानक नवे दृश्य पडद्यावर येतं. महाराजा एका हॉटेलमध्ये जातो आणि ज्या गुंडाने कार सफाई केलेल्या माणसाला मारले असते त्याला मानमोडे पर्यंत मारतो. महाराजाला त्याचा संशय येतो. महाराजा त्याचा पाठलाग करतो. ही हाणामारी म्हणजे महाराजाच्या मार खाणाऱया व्यक्तिमत्त्वातून एखादा आक्राळविक्राळ सिंह बाहेर पडावा आणि त्याने आपल्या शक्तीनिशी समोर आलेल्या गुंडांचा शेळ्या-मेंढय़ांसारखा फडशा पाडावा असा आहे. जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये महाराजा येतो तेव्हा तो एका पायाने लंगडत असतो. म्हणजे ही हाणामारी पोलीस स्टेशनमध्ये येण्याआधी झालेली आहे. हा संदर्भ प्रेक्षकांनी लावायचा आहे. कारण त्याच्या पायाला असलेले बँडेज आपण आधी पाहिलेले असते. त्यामुळे ही हाणामारी आता पडद्यावर दिसत असली तरी ती भूतकाळात होऊन गेलेली आहे हे प्रेक्षकांना जुळवायचं आहे.

सेलवा यातला व्हिलन आहे. त्याच्या मुलीच्या वाढदिवसाची तयारी चालू आहे. तोपर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त चित्रपट संपलेला असतो आणि हे दृश्य पंधरा वर्षांपूर्वी घडलेलं आहे. सेलवा महाराजाच्या दुकानात सोन्याची चेन विसरतो म्हणून ती देण्यासाठी महाराजा त्याच्या घरी जातो. त्याच वेळी पोलीस येतात आणि सेलवाला वाटतं की महाराजानेच पोलिसांना सांगितलं आहे. सेलवा त्याला खुन्नस देत निघून जातो. महाराजाच्या काही लक्षात येत नाही.

इकडे पोलीस इन्स्पेक्टर फोटोप्रमाणे हुबेहूब डबा बनवायला सांगतात. त्याला चेपून, घासून जुना बनवतात. इन्स्पेक्टरला आता एक चोर हवा असतो जो म्हणेल की ही चोरी मी केली आहे. म्हणून तो ओळखीचा नल्ला शिवा ज्याने हा डबा बनवलेला असतो त्याला सांगतो. तो पन्नास हजार रुपयासाठी ते स्वीकारतो. पण हळूहळू नल्लाच्या लक्षात येतं की ही चोरी तर आपणच केलेली आहे. त्या दिवशी आणखी काही घटना घडतात म्हणून तो तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. इन्स्पेक्टर त्याला जाऊ देत नाही.

इन्स्पेक्टर महाराजाला पुन्हा चोरी कशी झाली याची कथा सांगायला सांगतो. त्यावेळी ज्योती स्पोर्ट्स इव्हेंट मधून परत येत असते. महाराजा कथा सांगतो त्याच पद्धतीने ज्योती तिच्या वस्तू ठेवत असते. महाराजा पोलीस स्टेशनमध्ये असतो आणि चोर ज्योती वर बलात्कार करतात. हे दृश्य हृदयाचा थरकाप उडवणारे आहे. हादरवून टाकणार हे दृश्य सर्वात भयानक दृश्य आहे. शेवटची वीस मिनिटं प्रेक्षकांच्या मनातल्या शंका दूर करतात. अनेक दृश्यांची वेगळे पैलू पाहिल्यावर अच्छा हे असं होतं का, असे आश्चर्योदगार निघतात. कथा, पटकथा, अभिनय, संकलन कसं असावं याकरता हा चित्रपट पाहायलाच हवा.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)