शेतकरीच हटवणार मोदी सरकार, विश्वंभर चौधरी यांचा विश्वास

सध्याच्या सरकारबाबत सामान्य लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. या सरकारने गेल्या पाच वर्षांत शेतकऱयांना एक रुपयाची कर्जमाफी दिलेली नाही. शेतमालाला भाव नाही. नरेंद्र मोदी हटाव ही घोषणा आता सामान्य माणसे देत असून मोदींना हटविण्यासाठी या वेळी शेतकरी सर्वात पुढे असतील, असे मत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केले. तर सत्ताधारी नेरेटीव्ह तयार करत असून चारशे पार हे केवळ बुडबुडे असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली.

टिळक स्मारक मंदिर येथे काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे निर्मित आणि ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले संपादित ‘घोर नैराश्याची 10 वर्षे? या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून चौधरी बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. असीम सरोदे, संजय बालगुडे आदी उपस्थित होते.

उल्हास पवार म्हणाले,  डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तानशी हेरगिरी केली. त्याचे पुढे काय झाले? त्यावर हे लोक बोलत नाहीत. संघाच्या संस्कारात तयार झालेल्या व्यक्ती अशी कामे करतात आणि हे आपल्याला राष्ट्रवाद शिकवतात, असेही ते म्हणाले.

असीम सरोदे म्हणाले, बदल्यांच्या भावनेतून हे सरकार काम करते. विचारी हिंदू विरुद्ध विषारी हिंदू अशी ही लढाई आहे. देवेंद्र फडणवीस हे विषारी हिंदू आहेत. राज्यातील राजकारण हे फडणवीस यांनी नासवले असल्याची टीका त्यांनी केली.

पेटलेली मशाल त्यांना जागा दाखवून देईल!

नरेंद्र मोदी हे जाहिरातींच्या प्रेमात असलेला माणूस आहे. तामिळनाडू, केरळ या सुशिक्षित राज्यात त्यांना यश मिळविता आले नाही. महाराष्ट्र राज्यातदेखील त्यांना हे जमलेले नाही. राज्यात पेटलेली मशाल त्यांना जागा दाखवून देईल, असे ऍड. सरोदे यांनी या वेळी सांगितले.