नियतीने मला राजकारणात आणले, नरेंद्र मोदी यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा

माझा जन्म जैविकदृष्टय़ा झालेला नाही तर ईश्वरानेच मला त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर पाठवले आहे, असे विधान केल्याने सर्वत्र हसे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता मला वेगळे करायचे होते, पण नियतीने मला राजकारणात आणले असे विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीत तोंडघशी पडल्याने आणि सध्या एकापाठोपाठ घडत असलेल्या पडझडीच्या घटनांमुळे मोदी राजकारणातून संन्यास घेण्याच्या तर तयारीत नाहीत ना, अशी चर्चा आता त्यांच्या विधानामुळे सोशल मीडियावर रंगली आहे.

न्यूयॉर्कमधील हिंदुस्थानवासियांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला मोदी यांनी संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते. मी अनेक वर्षे देशांत भटकत राहिलो. जिथे जेवायला मिळाले तिथे जेवलो. जिथे झोपायला मिळाले तिथे झोपलो. मी काहीतरी वेगळे करायचे ठरवले होते परंतु, नियतीने मला राजकारणात नेले. एक दिवस मी मुख्यमंत्री होईन, असा कधीही विचार केला नव्हता. मी सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होईन, असा कधीही विचार केला नव्हता. लोकांनी मला बढती दिली. पंतप्रधान झालो. जनतेने मोठय़ा विश्वासाने तिसऱ्यांदा सत्ता सोपविली. आपला देश ऊर्जेने आणि स्वप्नांनी भारलेला आहे, असे मोदी म्हणाले.