आयपीएलचा नवा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सहाय्यक प्रशिक्षक विजय दहिया यांनी लखनौ सुपर जायंट्सला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. विजय दहिया 2022 मध्ये गौतम गंभीर आणि ऍण्डी फ्लॉवरसह संघात सामील झाला होता. लखनौने 2022 आणि 2023 आयपीएलमध्ये प्ले ऑफ गाठले होते. विजय दहियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून लखनौ सोडत असल्याची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे ‘एलएसजीला अलविदा करण्याची वेळ आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून लखनौसोबत काम करणे हा एक अद्भुत अनुभव असल्याचेही त्याने सांगितले.’ आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वीच गौतम गंभीर आणि ऍण्डी फ्लॉवर यांनी संघ सोडला होता. गौतम गंभीर लखनौ सुपर जायंट्सशी मेंटॉर म्हणून करारबद्ध होता तर ऍण्डी फ्लॉवर मुख्य प्रशिक्षकपद सांभाळत होता. लखनौ सोडल्यानंतर गंभीरने कोलकाता नाईट रायडर्समध्ये प्रवेश केला आहे.