आमदार अपात्रतेबाबतची कार्यवाही लवकरच

शिवसेनेशी गद्दारी करणारे एकनाथ शिंदे आणि सहकारी आमदारांच्या अपत्रातेबाबत निर्णय घेण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी आज सांगितले.

आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय राहुल नार्वेकर यांच्या हाती आहे. तत्पूर्वी ते दोन्हीकडील आमदारांची बाजू ऐकून घेणार आहेत. त्यासाठी सुनावणी सुरू झाली नसून पुढील आठवडय़ापासून ती होईल असे सांगण्यात येते.

सर्वोच्च न्यायालयाने 11 मे रोजी यासंदर्भात निर्णय देताना अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या कक्षेत येतो असे सांगितले होते. तसेच लवकरात लवकर निर्णय घ्यावा असेही निर्देश न्यायालयाने दिले होते.

राहुल नार्वेकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यासंदर्भात माहिती दिली. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व कायदेशीर बाबी आणि घटनात्मक तरतुदींचे पालन केले जाईल असे ते म्हणाले. सुनावणीसंदर्भात काही कागदोपत्री तयारी सुरू असून लवकरच प्रत्यक्ष सुनावणी सुरू होईल असे त्यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही असेही ते म्हणाले.