शिक्षकांना केवळ दिवाळी सुट्टीत ‘इलेक्शन डय़ुटी’, निवडणूक आयोगाने परिपत्रकात केला बदल

ऐन परीक्षा काळात शिक्षकांना ‘इलेक्शन डय़ुटी’ करायला सांगणाऱ्या निवडणूक आयोगाने अखेर आपल्या परिपत्रकात बदल केला. शिक्षकांना केवळ दिवाळी सुट्टीत निवडणुकीच्या कामासाठी बोलावले जाईल. नंतर मतदान व मतदानाच्या आदल्या दिवशी काम करावे लागेल, अशी माहिती निवडणूक आयोगाने सोमवारी उच्च न्यायालयात दिली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना ‘इलेक्शन डय़ुटी’ लावत केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुंबई महापालिकेने परिपत्रके काढली. त्या परिपत्रकांना कुर्ला येथील ग्रीन मुंबई प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. यावर न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे अॅड. अक्षय शिंदे यांनी बाजू मांडली. त्यांनी निवडणूक आयोगाच्या 17 ऑक्टोबरच्या सुधारित परिपत्रकाची माहिती दिली.