विधानसभेची लढाई ही आरपारची, प्रत्येकाला छातीचा कोट करून लढावं लागेल; संजय राऊत यांचे आवाहन

लोकसभेची  निवडणूक आपण ताकदीने लढलो आणि जिंकलो. एवढय़ा जागा जिंकलो तरी शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. आपण कष्ट केले. नवीन पक्ष, नवीन चिन्ह, आपल्या समोर पैशाची ताकद, दहशतवाद या सगळय़ा गोष्टीला आपण पुरून उरलो आणि आपण लढलो. विधानसभेची लढाई म्हणजे आरपारची लढाई आहे. प्रत्येकाला छातीचा कोट करून यावेळी लढावं लागेल, असे आवाहन यावेळी शिवसेना नेते खासदार व पुणे जिल्हा संपर्क नेते संजय राऊत यांनी केले.

खासदार संजय राऊत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम्ही आम्हाला नेहमी सांगता, ते आम्ही कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱयांना सांगतो. आपण जे म्हणालात ‘एक तर तूर राहशील किंवा मी राहीन.’ राहणार तर आपणच आहोत, मात्र प्रत्येकाला छातीचा कोट करून यावेळी लढावं लागेल. आता आपली लढाई सत्तेवर येण्याची आहे. सर्वाधिक आमदार निवडून आणणं हे माझ्यासह सर्व शिवसैनिकांचं कर्तव्य आहे.

आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फॅन्स क्लबचे मेंबर आहोत, औरंगजेबाचे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज इथे जन्माला आले. औरंगजेब गुजरातला जन्मला. त्याची भाषा गुजराती होती, शिवाजी महाराजांची भाषा मराठी होती. औरंगजेबाचे व्यवहार उर्दूबरोबर गुजरातीतून चालत होते. जी औरंगजेबाची वृत्ती आहे ती भाजपाची वृत्ती आहे. महाराष्ट्र जिंकल्यावरच निवांतपणा येईल असं औरंगजेब म्हणायचा, पण त्याच्या आयुष्यात कधीही निवांतपणा आला नाही आणि या महाराष्ट्रात त्याची कबर खणली गेली. त्याप्रमाणेच भाजपाची कबरसुद्धा या महाराष्ट्रातच खणायची आहे, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत हेराफेरी

‘एडीआर’ संस्थेने लोकसभा निवडणुकीनंतर दिलेल्या अहवालात देशात 538 मतदारसंघांत हेराफेरी झाली आहे. प्रत्यक्ष मतदान आणि मोजलेल्या मतांमध्ये तफावत आहे. 362 मतदारसंघांतील आकडे झालेल्या मतदानापेक्षा साडेसहा लाखांनी कमी आहेत. 176 मतदारसंघांत दोन लाख मतं जास्त मोजली गेली. यात महाराष्ट्रात चार जागा 12, 15 हजारांपासून 50 हजार मतांनी हरल्या. मुंबईतील 48, हातकणंगले 12 हजार, तर बुलढाण्याची जागा अत्यंत कमी मतांनी हरलोय. उत्तर प्रदेशात, बिहारमध्येही असेच झाले. हेराफेरीचे उद्योगधंदे टाळण्यासाठी विधानसभा निवडणुकीत काळजी घेण्याचे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले.