महायुतीत जागांसाठी अजितदादा गटाची फरफट; तटकरे, पटेल यांचा अमित शहांच्या मागे तगादा

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला सोबत घेऊन महायुतीला फारसा फायदा झालेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सध्या असणाऱ्या जागांपेक्षा अधिक जागा देण्यास भाजप आणि मिंधे गट तयार नसल्याने अजित पवार गटाची महायुतीत फरफट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी अधिकच्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मागे तगादा लावला आहे.

लोकसभेला सपाटून मार खाल्ल्यानंतरही भाजप 150 ते 160 जागा लढण्यावर ठाम आहे. मिंधे गटाने 120 जागांवर दावा केला आहे, तर अजितदादा गट 60 ते 70 जागांसाठी आग्रही असल्याचे समजते आहे. जागावाटपावरून महायुतीत असलेली धुसफूस अधिक वाढू नये यासाठी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांनी विशेषतः अजित पवार गटाला देण्यात येणाऱ्या जागांबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. शहा यांच्या सूचनेनुसार भाजपच्या राज्यातील नेत्यांनी अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्याशी दोन दिवसांत तीन ते चार वेळा चर्चा केली. यावेळी त्यांनी सध्या त्यांच्याकडे असणाऱ्या जागांव्यतिरिक्त 10 ते 15 जागा अधिकच्या मिळाव्यात अशी मागणी लावून धरली.

विमानतळावरही जागावाटपाचा पाठपुरावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान विमानतळापासून अजित पवार गटाचे नेते त्यांच्या मागे होते. शहा यांचे विमानतळावर आगमन झाले त्यावेळी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल त्यांना भेटले. त्यानंतर रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर आज पुन्हा सकाळी दोन्ही पक्षांचे नेते अमित शहांना भेटले. अमित शहा परत गेल्यावर विमानतळावरच दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली.