हिंदुस्थानचा आज चीनविरुद्ध हल्लाबोल, आज लगावणार जेतेपदाचा पंच 

दक्षिण कोरियाचा 4-1 गोलफरकाने फडशा पाडत अंतिम फेरी गाठणारा गतविजेता हिंदुस्थानी संघ आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेचे पाचवे जेतेपद जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. स्पर्धेत विजयाचा अभूतपूर्व षटकार ठोकल्यानंतर आशियाई हॉकीवर आपलीच सत्ता असल्याचे दाखवण्यासाठी हिंदुस्थानने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. यजमान चीनविरुद्ध होणाऱ्या अंतिम लढतीत हिंदुस्थान आपला भन्नाट खेळ कायम राखत मोठय़ा विजयाची नोंद करणार असे संकेत पूर्वसंध्येलाही मिळाले आहेत.

हिंदुस्थानचेच पारडे जड

पूर्ण स्पर्धेवर हिंदुस्थाननेच वर्चस्व गाजवले आहे आणि अंतिम लढतीतही चीनविरुद्ध हिंदुस्थानचेच पारडे जड आहे हे कुणाला वेगळे सांगायची गरज नाही. साखळीतील पाच विजयांनंतर हिंदुस्थानने उपांत्य लढतीतही नॉनस्टॉप विजयाचा षटकार ठोकला. कोरियाचा 4-1ने धुव्वा उडवत ‘हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा’ हे हिंदुस्थानने दाखवून दिलेय. या स्पर्धेत हिंदुस्थानला कुणीही हरवू शकलेला नाही. कुणी बरोबरीत रोखू शकलेलाही नाही. चीनविरुद्ध झालेल्या साखळी लढतीतही हिंदुस्थानने चीनचा 3-0 ने फडशा पाडला होता. अंतिम लढतीतही यापेक्षा वेगळे दृश्य दिसणार नाही याची साऱयांनाच कल्पना आहे. चीनने साखळीत दोन विजय नोंदवले होते; मात्र उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध नोंदवलेल्या विजयामुळे चीनचे मनोधैर्य निश्चितच उंचावले आहे. पाकिस्तानविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये खळबळजनक विजयाची नोंद करत चीनने नवा इतिहास रचला. ते प्रथमच आशियाई अजिंक्यपद करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेत.

आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात 13 वर्षांपूर्वी म्हणजे 2011मध्ये झाली होती. गतविजेत्या हिंदुस्थानने या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक चार वेळा विजेतेपदाच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले आहे. आता विजेतेपदाचा ‘पंच’ लगावण्यासाठी हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघ आतूर झाला आहे. पाकिस्तानने तीन वेळा, तर दक्षिण कोरियाने एकदा ही स्पर्धा जिंकलेली आहे.

जीहून यांगच चीनची ताकद

या स्पर्धेत सर्वाधिक आठ गोल ठोकलेत ते चीनच्या जीहून यांगने. त्याने सात पेनल्टी कॉर्नरवर आणि एक पेनल्टी स्ट्रोकवर गोल ठोकला आहे. त्यामुळे यांगच चीनची खरी ताकद आहे. मात्र हिंदुस्थानचे अनेक खेळाडू फॉर्मात आहेत. खुद्द कर्णधार हरमनप्रीत सिंहने सात गोल ठोकले आहेत. त्यात दोन मैदानी आणि पाच पेनल्टी कॉर्नर गोल आहेत. तसेच उत्तम सिंह, अराईजीत सिंह, राजकुमार पाल यांनीही गोलांचा वर्षाव करत आपल्या स्टिकची ताकद दाखवून दिली आहे. या पूर्ण स्पर्धेत हिंदुस्थानच्या आक्रमणाला रोखणे कुणालाही जमलेले नाही. तसेच बचावफळीलाही  भेदता आलेले नाही. त्यामुळे चीन किती क्षमतेने खेळतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

चीनकडून पाकिस्तान शूटआऊट

यजमान चीनने शूटआऊटपर्यंत ताणलेल्या पहिल्या उपांत्य लढतीत बलाढय़ पाकिस्तानचा 2-0 गोलफरकाने पराभव करीत आशियाई हॉकी अजिंक्यपद करंडक स्पर्धेची फायनल गाठून इतिहास घडविला. युआनलिन लू याने 18व्या मिनिटाला गोल करीत चीनला 1-0 असे आघाडीवर नेले. त्यानंतर अहमद नदीमने 37व्या मिनिटाला गोल करीत पाकिस्तानला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेत ही बरोबरीची कोंडी फुटू न शकल्याने लढत शूटआऊटमध्ये गेली. या मोक्याच्या वेळी चीनचा गोलरक्षक वैयू वांग गोलपोस्टपुढे चिनी भिंतीप्रमाणे उभा राहिला. बेनहाई चेन व चानलियांग लिन यांनी गोल करीत चीनला 2-0ने विजय मिळवून दिला. स्पर्धेच्या इतिहासात चीनने प्रथमच फायनलमध्ये धडक दिली हे विशेष. आता  स्वप्न भंगलेल्या पाकिस्तानला कांस्यपदकाच्या लढतीत दक्षिण कोरियाचे आव्हान असेल.