आईचे आशीर्वाद घेऊन केजरीवाल कारागृहात, 5 जूनपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी

दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळय़ाप्रकरणी जामिनावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक आज आई-वडिलांचे आशीर्वाद घेऊन पुन्हा कारागृहात परतले. सायंकाळी 5 वाजता ते तिहार जेलमध्ये दाखल झाले. त्यापूर्वी त्यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधला. मला माहीत नाही मी पुन्हा कधी परतेन. इथे माझ्यासोबत आणखी काय काय होईल, मात्र मोदी सरकारवर एकप्रकारे दबाव निर्माण झाला आहे हे नक्की, अशा शब्दांत केजरीवाल यांनी इंडिया आघाडीच सत्ता स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, राऊज एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांना 5 जूनपर्यंत ईडीची न्यायालयीन कोठडी सुनावली.

सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले

केजरीवाल यांनी अंतरिम जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर मी 21 दिवस निवडणूक प्रचारासाठी बाहेर होतो. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे खूप खूप आभार,’ अशी पोस्ट केजरीवाल यांनी ‘एक्स’द्वारे प्रसिद्ध केली.

दिवसभरात काय घडले?

अरविंद केजरीवाल यांनी दुपारी साडेतीन वाजता राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळावर आदरांजली अर्पण केली. त्यानंतर कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि थेट आम आदमी पार्टीचे कार्यालय गाठले.

माझ्यासाठी देश महत्त्वाचा

मी हुकूमशाहीविरोधात आवाज उठवला म्हणून मला जेलमध्ये टाकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी अनुभवी चोर आहे. मग तुमच्याकडे माझ्याविरोधात कोणताही पुरावा का नाही? तुम्ही पुराव्याशिवाय मला जेलमध्ये टाकले? या हुकूमशाहीविरोधात मी लढतोय आणि आपला देश ही हुकूमशाही कधीच सहन करू शकत नाही, असे केजरीवाल म्हणाले.