दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. लॉरेन्सवर आत्तापर्यंत अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. यासाठीच तो तुरुंगात आहे. मात्र तुरुंगातूनही तो अनेक गुन्हे घडवून आणत आहे. त्यामुळे लॉरेन्सला सरकारकडून संरक्षण मिळत असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
लॉरेन्स बिष्णोईसारखा कुख्यात गुंड तुरुंगातूनही गुन्हे घडवून आणत आहे. यावरूनच केजरीवाल यांनी गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला. “लॉरेन्स बिष्णोईसारखे गुन्हेगार उघडपणे कसे गुन्हे घडवून आणत आहे? यात त्याला सरकारकडून पाठिंबा कोणत्याही प्रकारचे समर्थन मिळत नसल्याची शक्यता आहे का?” या प्रकरणी जनतेला उत्तरे हवी आहेत, असे ते म्हणाले. अशा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमुळे देशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यामुळे असे गुन्हे वेळीच न थांबवणे देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका निर्माण करणारे आहे. केंद्र सरकार गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.
दिल्लीतील वाढत्या गुन्ह्यांवर आम आदमी पार्टीने (आप) केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. दिल्लीत गुंड आणि माफिया खुलेआम कारवाया करत असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. गुन्हेगारांची हिंमत इतकी वाढली आहे की, गृहमंत्र्यांच्या निवासस्थानापासून अवघ्या काही अंतरावर बलात्कार, खून आणि अन्य गंभीर गुन्हे घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्लीत ओपन गॅंगवॉर सुरू आहे. खंडणीचे कॉल येत आहेत, खुलेआम गोळीबार होत आहे. दिल्लीच्या रस्त्यावर फोन घेऊन चालणे कठीण झाले आहे, असे केजरीवाल म्हणाले. यावेळी त्यांनी ग्रेटर कैलाशमधील जिम मालकाच्या हत्येचा उल्लेख केला. कारण या प्रकरणातही मध्ये लॉरेन्स बिश्नोईचे नाव पुढे आले. तसेच त्यांनी इतरही गुन्ह्यांचा पाढा वाचला.