दिल्ली मद्य घोटाळा; अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

कथित मद्य घोटाळा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले ‘आप’चे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांना 8 ऑगस्टपर्यंत तर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया आणि बीआरएसच्या कविता यांची न्यायालयीन कोठडीही 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदीया आणि कविता यांना हजर करण्यात आले होते.

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर याआधी सुनावणी झाली. जेष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी आणि विक्रम चौधरी यांनी केजरीवाल यांची बाजू मांडली. तर सीबीआयच्या वतीने सरकारी वकील डीपी सिंग यांनी युक्तीवाद केला.

यावेळी युक्तीवाद करताना केजरीवाल यांच्या वकिलांनी तब्येतीचा मुद्दा अधोरेखित केला. केजरीवाल झोपेत असताना त्यांच्या रक्तातील साखर पाच वेळा 50 च्या खाली गेली आहे. आरोग्याच्या कारणावरून सर्वांना जामीन मिळत आहे. मग केजरीवाल यांच्यापासून समाजाला धोका कसा? असा सवाल वकिलांनी उपस्थित केला. माझ्या पक्षाचे नाव आम आदमी पार्टी आहे. मात्र, मलाच जामीन मिळत नाही. वस्तुस्थिती लक्षात घेऊन मला जामीन देण्यात यावा, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांच्यामार्फत वकील सिंघवी यांनी केली. या युक्तीवादाला सीबीआयचे वकील डीपी सिंह यांनीही न्यायालयासमोर भूमिका मांडली.

व्ही. के. सक्सेना यांचा केजरीवाल यांच्यावर आरोप

तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत अरविंद केजरीवाल यांना दिला जाणारा पोषक आहार आणि औषधे बहुधा जाणूनबुजून ते घेत नाहीत, असा आरोप दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी केला आहे. मुख्य सचिव नरेश कुमार यांना लिहिलेल्या पत्रात नायब राज्यपाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आरोग्याबाबत तुरुंग अधीक्षकांच्या अहवालाचा दाखला दिला.