केजरीवाल यांना गोवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा जुंपलीये, ही हुकूमशाही आणि आणीबाणी; पत्नी सुनीता यांचा संताप

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने कथित मद्य धोरण प्रकरणात अटक केली आहे. यावर आता  CM केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर येऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा एकवटली असून ही हुकूमशाही आहे, ही आणीबाणी आहे, असा संताप व्यक्त केला आहे.

मनी लाँड्रींग प्रकरणात केजरीवाल यांना जामीन मिळण्याची शक्यता होती. त्यावेळी भाजप घाबरला आणि त्यांनी सीबीआयद्वारे खोट्या प्रकरणात त्यांना अटक केली, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने बुधवारी कथित मद्य घोटाळा प्रकरणात केजरीवाल यांना औपचारीकपणे अटक केली आहे आणि भ्रष्टाचार प्रकरणात केजरीवाल यांना पाच दिवसांची कोठडी मागितली.

सुनीता केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये केली आहे. अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात 20 जून रोजी जामीन मिळाला होता. त्यावर ईडीने तत्काळ स्थगिती मिळवली. दुसऱ्याच दिवशी सीबीआयने त्यांना आरोपी बनवले आणि बुधवारी त्यांना अटक केली. केजरीवाल तुरुंगातून बाहेर येऊ नये यासाठी संपूर्ण व्यवस्था प्रयत्न करत आहेत. हा कायदा नाही, ही तर हुकूमशाही आणि आणीबाणी आहे, असा संताप सुनीता केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.

‘आप’ने केजरीवाल यांच्या अटकेवरून टीका केली आहे. हुकूमशाहीने क्रूरतेची सर्व हद्द पार केली आहे, अशी टीका ‘आप’ने केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बुधवारी जामीन मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे आता भाजपने त्यांना एका खोट्या प्रकरणात सीबीआयकडून अटक केली. सीबीआय केजरीवाल यांना राउज एव्हेन्यू कोर्टात घेऊ गेली. जिथे त्यांच्या रक्तातील साखर कमी झाली. त्यामुळे हुकूमशाही असो किंवा हवा तितका छळ करा, केजरीवाल झुकणार नाही आणि तुटणारही नाही, असा हल्लाबोल ‘आप’ने केला.

सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना औपचारिकपणे अटक केली आणि पाच दिवसांची कोठडी मागितली. विशेष न्यायाधीश अमिताभ रावत यांनी कोठडी याचिकेवरील निर्णय राखून ठेवला. न्यायालयासमोर केलेल्या निवेदनात केजरीवाल यांनी या प्रकरणात निर्दोष असल्याचे सांगितले. मनीष सिसोदिया आणि आम आदमी पार्टीचे दोघेही निर्दोष आहेत, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.