दिल्लीत महिला सन्मान योजना, 2100 रुपये मिळणार; निवडणुकीपूर्वी केजरीवालांची मोठी घोषणा

दिल्ली सरकारने ‘महिला सन्मान योजना’ मंजूर केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या मुख्यालयात या योजनेबाबत दोन घोषणा केल्या. यामध्ये पहिल्या घोषणेत ही योजना आजपासून लागू करण्यात आली आहे. पण पैसे निवडणुकीनंतर येतील. तर निवडणुकीनंतर ‘आप’चे सरकार स्थापन झाल्यास महिलांना दरमहा 2100 रुपये दिले जातील, अशी दुसरी घोषणा त्यांनी यावेळी केली.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, कॅबिनेटने महिला सन्मान योजना मंजूर करून ही योजना लागूही केली आहे. ते म्हणाले की, रजिस्ट्रेशनची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू केली जाणार आहे. मात्र, निवडणुकीची घोषणा 10 ते 15 दिवसांत होणार असून एवढ्या कमी वेळात पैसे अकाऊंटमध्ये जाणे शक्य नाही. केजरीवाल म्हणाले की, काही महिलांनी त्यांच्याकडे येऊन सांगितले की, महागाई वाढली आहे, 1000 रुपये पुरेसे नाहीत. त्यासाठी आता त्यांनी ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याची घोषणा केली आहे. हे पैसे त्याच महिलांना मिळणार ज्या करदात्या नाहीत किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेंतर्गत पेन्शन घेत नाहीत. केजरीवाल म्हणाले की, आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन रजिस्ट्रेशन करणार आहेत. महिलांना एक कार्ड दिले जाईल, ते त्यांना जपून ठेवावे लागणार आहे. निवडणुकीनंतर 1000 वाल्या योजनेत बदल करून 2100 रुपये केले जाईल, असे ते म्हणाले.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, महिला सन्मान योजनेची घोषणा मार्चमध्ये करण्यात आली होती. एप्रिल-मे पासून ही योजना लागू करणार होते. मात्र, आपल्याला तुरुंगात पाठवण्यात आल्याने या योजनेला उशीर झाला. केजरीवाल म्हणाले की, या लोकांनी खोट्या केसेस करून तुरुंगात पाठवले. तिथे सहा ते सात महिने होतो. परतल्यानंतर ही योजना लागू करण्यासाठी धडपड सुरू होती आणि आता आमच्या मेहनतीने ही योजना दिल्लीत लागू झाली आहे. दिल्ली सरकारने मार्च 2024 च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. त्यावेळी सर्व महिलांना 1000 रुपये देण्याची घोषणा केली होती. आता ही रक्कम वाढवून 2100 रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे.